एनएमएमटी बसच्या वेळा, मार्ग जाणून घेणे सोपे
नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन सेवेचा दर्जा सुधारावा आणि प्रवास सुलभ व्हावा यासाठी ‘एनएमएमटी बस ट्रॅकर’ हे मोबाइल अॅप सुरू करण्यात आले आहे. पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या संकल्पनेतून हे अॅप साकार झाले आहे. त्यासाठी आय.आय.टी.एस. (इंटेलिजंट इंटिग्रेटेड ट्रान्स्पोर्ट सिस्टीम) या प्रणालीचा वापर करण्यात आला आहे.
अॅपवर बसचे वेळापत्रक उपलब्ध आहे. आपल्याला ज्या बसने प्रवास करायचा आहे, ती कोणत्या थांब्यावर पोहोचली आहे, हे या अॅपमुळे जाणून घेता येईल. एनएमएमटीच्या सर्वाधिक गर्दीच्या ८१ थांब्यांवर एलईडी लावण्यात येणार असून त्यामुळे प्रवाशांना त्यांना अपेक्षित असलेली बस थांब्यावर येण्याच्या वेळेची माहिती मिळेल. डिजिटल तिकीट आणि स्मार्ट कार्डचा वापर करण्याची सुविधाही लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल, असे आयुक्त मुंढे यांनी सांगितले.
नवी मुंबई पालिकेच्या ४४५ बसगाडय़ा प्रवाशांच्या सेवेत आहेत. ही संख्या लवकरच ५०० पर्यंत नेण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. केवळ दीड महिन्यात आय.आय.टी.एस. कार्यान्वित करणारी नवी मुंबई ही देशातील पहिली महानगरपालिका आहे. ही प्रणाली प्रभावीपणे राबविण्यासाठी सीबीडी येथील बेलापूर भवनात आठव्या मजल्यावर विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. या प्रणालीमुळे आपत्कालीन व्यवस्थापन व नियोजन सोपे होईल, असा विश्वास तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केला.
अॅपचा फायदा काय?
- जवळचा थांबा कुठे आहे, याची माहिती मिळेल.
- ज्या ठिकाणाहून बसप्रवास सुरू करायचा आहे, त्या ठिकाणाहून कोणत्या बस कुठे जातात याची माहिती मिळेल.
- कोणती बस किती वेळानंतर त्या बस थांब्यावर येईल हे जाणून घेता येईल.
