नवी मुंबई : आठ वर्षांनंतर नवी मुंबई महानगरपालिका परिवहन (एनएमएमटी) उपक्रमाच्या ताफ्याच्या नूतनीकरणाला सुरुवात झाली असून, पहिल्या टप्प्यात ५१ सीएनजी बस शनिवारी प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्या. घणसोली आगारात राज्याचे वने मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते या बसांचा शुभारंभ करण्यात आला. वर्षभरात टप्प्याटप्प्याने एकूण १५० सीएनजी बस ताफ्यात समाविष्ट करण्याचे नियोजन असून, त्यामुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

गेल्या आठ वर्षांत एनएमएमटीच्या ताफ्यात नवीन बस दाखल झाल्या नव्हत्या. दरम्यान, जुन्या डिझेल वाहनांचा वापर कमी होत गेल्याने अनेक मार्गांवरील फेऱ्यांवर परिणाम झाला होता. नवी मुंबईचा विस्तार, वाढती प्रवासी संख्या तसेच मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, उरण आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसराशी वाढणारी दळणवळणाची गरज लक्षात घेऊन परिवहन सेवेचे आधुनिकीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या सीएनजी बसेसमुळे प्रमुख मार्गांवरील फेऱ्यांची संख्या वाढून प्रवाशांचा प्रतीक्षाकाल कमी होण्याबरोबरच प्रदूषणमुक्त सार्वजनिक वाहतुकीलाही चालना मिळणार आहे.

उद्घाटनप्रसंगी बोलताना गणेश नाईक यांनी नागरिकांना दर्जेदार, विश्वासार्ह आणि परवडणारी परिवहन सेवा उपलब्ध करून देणे हे महापालिकेचे प्राधान्य असल्याचे सांगितले. परिवहन उपक्रम आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करण्यावर भर दिला जाईल. वाशी बस आगाराच्या धर्तीवर अन्य आगारांतील उपलब्ध जागेचा व्यावसायिक वापर करून व्यापारी संकुले, हॉटेल आणि अन्य सुविधा विकसित करण्याचा विचार आहे. या माध्यमातून मिळणाऱ्या महसुलाचा उपयोग परिवहन सेवा अधिक सक्षम करण्यासाठी आणि प्रवाशांना योग्य दरात सेवा उपलब्ध करून देण्यासाठी केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

परिवहन उपक्रमाच्या उत्पन्न-खर्चाचा सर्वंकष आढावा घेऊन आवश्यक त्या सुधारणा करण्यात येतील. वाहनांच्या देखभाल-दुरुस्तीत गुणवत्ता आणि पारदर्शकतेला प्राधान्य दिले जाईल. चालक, वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांनी प्रवाशांशी सेवाभावी दृष्टिकोनातून वागावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

या कार्यक्रमास महापौर सुजाता पाटील, उपमहापौर दशरथ भगत, परिवहन समितीचे सभापती विकास झंजाड, परिवहन व्यवस्थापक उमाकांत जंगले, महापालिकेचे पदाधिकारी, अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.