एनएमएमटीचा प्रवास महागणार

परिवहन सेवा तोटय़ात असल्यामुळे तिकीट दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

NMMT bus
बसच्या तिकिटात २ ते ५ रुपयांची वाढ करण्याच्या प्रस्तावास सोमवारी परिवहनच्या मासिक सभेत मंजुरी देण्यात आली.

साध्या बसच्या भाडय़ात २ ते ५ रुपयांची वाढ; ‘एसी’ प्रवास स्वस्त

नवी मुंबई परिवहन सेवेची लवकरच भाडेवाढ होण्याची चिन्हे असून, साध्या बसच्या तिकिटात २ ते ५ रुपयांची वाढ करण्याच्या प्रस्तावास सोमवारी परिवहनच्या मासिक सभेत मंजुरी देण्यात आली. एसी बसच्या तिकिटात मात्र ५ ते १० रुपयांची घट होणार आहे.

नवी मुंबई परिवहन सेवेची सोमवारी मासिक सभा झाली. या सभेत दरवाढीचा प्रस्ताव मंजुरीसाठी पटलावर आला होता. त्याला शिवसेनेच्या सदस्यांनी विरोध केला, मात्र सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या सदस्यांनी बहुमताच्या जोरावर प्रस्ताव मंजूर करून घेतला. हा प्रस्ताव आता शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. शासनाने मंजुरी दिल्यास ही दरवाढ अटळ आहे.

एनएमएमटीने २०१३ मध्ये दरवाढ केली होती. त्यानंतर अद्याप दरवाढ करण्यात आली नव्हती. वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) तसेच डिझेलच्या दरामध्ये झालेली वाढ यामुळे परिवहन सेवेला मासिक ३.५० कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे परिवहन सेवेने दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे, पण या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. परिवहनच्या बैठकीत शिवसेनेच्या सदस्यांनी या दरवाढीला विरोध केला. तोटा भरून काढण्यासाठी तिकीट दरवाढ करणे हा एकमेव पर्याय नसून, बस थांब्यांवरील जाहिराती, डेपोमधील दुकाने आणि अन्य मार्गानीही तोटा भरून काढता येईल, अशी सूचना परिवहन सदस्य समीर बागवान यांनी केली. परिवहन सेवेने आकडेवारी सादर करावी, अशी मागणी करण्यात आली, मात्र प्रशासनाकडे कोणतीही आकडेवारी उपलब्ध नव्हती. राष्ट्रवादीचे राजू शिंदे यांनी परिवहन सेवेचा तोटा भरून काढण्यासाठी आणखी दोन रुपयांची दरवाढ करण्याची उपसूचना केली. शिवसेनेच्या सदस्यांनी त्याला जोरदार विरोध केला. ओला, उबरसारख्या सेवांमुळे अनेकांनी एसी बसकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे होणारा तोटा भरून काढण्यासाठी एसी बसचे तिकीट कमी करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. परिवहन सभापती प्रदीप गवस यांच्याशी संपर्क साधला असता, होऊ शकला नाही.

परिवहन सेवा तोटय़ात असल्यामुळे तिकीट दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा प्रस्ताव परिवहनच्या मासिक सभेत मंजुरीसाठी आला होता. पण शासनाची मंजुरी मिळाल्यांनतरच दरवाढ लागू होणार आहे. एसी बसच्या दरामध्ये घट करण्यात आली आहे. एसी बस तोटय़ात चालल्या आहेत. हा तोटा भरून काढण्यासाठी एसी बसच्या दरात घट करण्यात आली आहे.

शिरिष आरदवाड, परिवहन व्यवस्थापक

शिवसेनेच्या सदस्यांनी प्रशासनाकडून आलेल्या या प्रस्तावाला विरोध केला. पण राष्ट्रवादीच्या सदस्यांनी मात्र बहुमताच्या जोरावर हा प्रस्ताव मंजूर केला. एनएमएमटी तोटय़ात चालली आहे, हे खरे असले तरी फक्त तिकीट वाढवून त्यातून बाहेर निघणे हा एकमेव पर्याय नाही. परिवहनने बस थांब्यांवरील जाहिराती, डेपोतील उपाहारगृहे अशा पर्यायांतून उत्पन्न वाढवले पाहिजे.

– समीर बागवान, परिवहन सदस्य

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Nmmt set to hike bus fares by rs 2 to

ताज्या बातम्या