संतोष सावंत

पनवेल महापालिका क्षेत्रातून माथेरान मार्गावरून नेरे परिसरात जाताना नवीन पनवेल वसाहतीमधील आदई सर्कल ओलांडल्यानंतर सुरू होणाऱ्या परिसराला ‘सुकापूर’ असे नाव आहे. मात्र शासन दफ्तरी सुकापूर गावच्या नावाचा उल्लेख आढळत नाही. त्यामुळे कोणत्याही दाखल्यावर नाव ठिक आहे, पण गावचा काही ‘पत्ता’ नाही, अशी काही भावना येथील ग्रामस्थ आणि नागरिकांमध्ये आहे.

नुकताच जिल्हा परिषदेने येथे  बसथांबा उभारला आहे. या थांब्याला सुकापूर असे नाव दिले आहे. मात्र या व्यतिरीक्त महसूल विभागाच्या तलाठय़ांच्या दफ्तरी मात्र अशा कोणत्याही गावाची नोंद १९३८ सालापासून दिसत नाही.

रहिवाशी आणि ग्रामस्थ ज्या परिसराला सुकापूर असे संबोधतात. त्याच परिसराला तलाठय़ांच्या दफ्तरातील नोंदीप्रमाणे पाली देवद आणि शिलोत्तर रायचूर अशी वेगवेगळी दोन नावे आहेत.

पनवेल तालुक्यात १९५० सालापासून पाली देवद व शिलोत्तर रायचूर या गावांना सुकापूर असे बोलले जाऊ लागल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात मात्र हे नामकरण नेमके कोणी आणि कधी केले, याचा कोणताही तपशील कुठेही आढळत नाही. सध्या या सुकापूर नावाने महसूल  विभागातील कामांत मोठा गोंधळ उडत आहे. पालीदेवद गावाची महसूली हद्द ५२ हेक्टर तर शिलोत्तर रायचूर गावाची हद्द ४१ हेक्टर जमीनीवर आहे. १९८० पासून लहान वाटणाऱ्या या दोनही गावांच्या गावठाणाचा विस्तार झाला आणि पाचशे ते एक हजार वस्तीचे गाव सध्या ३० हजारांहून अधिक लोकवस्ती बनले. पनवेल रेल्वेस्थानकापासून काही अंतरावर ही दोनही गावे असल्याने मुंबईतील चाकरमान्यांनी याच परिसरात स्वस्त घरे घेण्यास पसंती दिली.

मुंबइ-पुणे द्रुतगती महामार्ग आणि बाजारपेठेसाठी पनवेल आणि नवीन पनवेल सारखी शहरे हाकेच्या अंतरावर असल्याने अनेकांनी वास्तव्याचे ठिकाण म्हणून पाली देवद व शिलोत्तर रायचूर या गावांमधील गावठाण विस्तारासाठी निवडले. याच परिसरात बालाजी सिंफोनीक हा मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाच्या परवानगीने बांधलेला खासगी गृहप्रकल्प याच परिसराची ओळख आहे.

२४ हजार मतदार संख्या असलेल्या या दोनही गावांमधील ग्रामस्थांनी आजवर ग्रामपंचायतींमध्ये सुकापूर असे नवीन नामकरण करण्यासाठी कधीही मागणी केली नसल्याचे या ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सांगतात. मात्र येथे उभारलेल्या सुमारे दीडशेहून अधिक गृहसंस्थांनी त्यांच्या पत्यासाठी सुकापूर असे लिहिले आहे.

या इमारतींतील रहिवाशी नातेवाईकांना रिक्षाचालक, बस वाहकांना पत्ता सांगताना सुकापूर असेच सांगतात.

या परिसराला व्यवहारातील ओळख सुकापूर या नावाची असल्याने रहिवाशी त्यांच्या पाल्यांसाठी शालेय प्रवेशासाठी रहिवाशी दाखला, उत्पन्नाचा दाखला व इतर सरकारी दाखले काढण्यासाठी ज्यावेळी तलाठी विभागात जातात त्यावेळी तेही पत्ता म्हणून परिसराचा पत्ता म्हणून सुकापूर असा लिहितात.

वर्षांला सुमारे दोन हजार दाखल्यांसाठी विद्यार्थी तलाठय़ांकडे येतात. कोणत्याही सरकारी यंत्रणेने गावच्या नावाच्या गोंधळावर पडदा पडण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. ते आमचे काम नाही, अशी या विविध सरकारी विभागातील कर्मचारी सांगत असतात.

मी सहा वर्षांपासून येथे आहे. येथे अनेकजण सूकापूर बोलतात. जिल्हा परिषदेच्या एका शाळेला सूकापूर असेच नाव देण्यात आले आहे. आम्ही नाव बदलणारे कोण, तसा प्रस्ताव ग्रामसभेने ठेवला पाहीजे. पाली देवद हेच नाव व्यवहारात वापराने असा आग्रहाचा प्रस्ताव कोणी ठेवला नाही आणि सूकापूर हे नवीन नाव असावे असाही प्रस्ताव कोणी ठेवला नाही. गावचे नाव बदलणे हे कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याचे काम नाही.

– नंदकिशोर भगत, ग्रामसेवक, पालीदेवद ग्रामपंचायत

आम्ही ज्यावेळी चुकीचे नाव रहिवाशी वा विद्यार्थी लिहून आणतात त्यावेळी त्यांना त्यांची चूक ध्यानात आणून देतो. जे कागदोपत्री गावांची नावे आहेत. त्यात बदल करण्यापेक्षा प्रत्यक्षात जे नाव आहे त्याविषयी जनजागृती करणे गरजेचे आहे.

– संजय पाटील, तलाठी, पालीदेवद ग्रामपंचायत