पनवेल : खारघर वसाहत आणि कोपरा गावाला जोडणाऱ्या उड्डाण पुलाखालील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पुलाखालून पनवेल शीव महामार्ग गाठण्यावर यापुढे नो एन्ट्री लागू करण्यात आली आहे. नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी २१ जूनपर्यंत हरकती मागविल्यानंतर ही अधिसूचना काढली. मंगळवारपासून या अधिसूचनेची अंमलबजावणी होणे अपेक्षित होती मात्र तसे झाल्याचे दिसत नाही. सततच्या वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी वाहतूक पोलिसांनी हा उपाय योजला असला तरी कोपरा गावातील ग्रामस्थांना खारघरमधून गावात परतण्यासाठी खारघर हिरानंदानी चौकातून आणि कळंबोली रोडपाली येथील उड्डाणपुलाखालून वळसा मारून जावे लागणार आहे.

कोपरा गाव हे खारघर वसाहतीच्या मध्यभागी आहे. गाव आणि वसाहतीच्या पोटातून मधोमध शीव पनवेल महामार्ग जातो. वसाहतीमधील सेक्टर ३ ते ४० हा परिसर शीव पनवेल महामार्गाच्या एका बाजूला तर सेक्टर १ ते १० हा परिसर दुसऱ्या बाजूला आहे. वसाहतींच्या या दोन्ही परिसरात जाण्यासाठी अधिकृत हिरानंदानी चौक, कोपरा पूल आणि बेलपाडा पूल असे तीन पर्याय प्रवाशांसाठी आहेत. मात्र अनेक वर्षांपासून सायंकाळी व सकाळच्या वेळेला कामावर जाणाऱ्यांच्या घाईमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी कोपरा उड्डाणपुलाखाली होताना दिसते. दररोजच्या त्रासाला वैतागून खारघर सेक्टर ११ येथून महामार्ग ओलांडून सेक्टर १० मध्ये येणाऱ्या वाहनांवर निर्बंध लावल्यास हा प्रश्न सुटेल यावर वाहतूक पोलिसांचे एकमत झाले आहे. याबाबत कायदेशीर कार्यवाही झाली असून ही अंमलबजावणी झाल्यास कोंडीचा प्रश्न निकाली निघणार आहे. कोंडीत अनेक मिनिटे वाहनांचे इंधन वाया जात असल्याने हा मार्ग काढला आहे. परंतु याच वळसा मार्गामुळे कोपरा गावातील वाहनचालकाला खारघरच्या डीमार्ट दुकानातून घरी येण्यासाठी कळंबोली रोडपाली येथील उडडाणपुलाखालून वळसा घेऊन यावे लागणार आहे.