नागरिकांची गैरसोय; दोन कोटी ९६ लाख रुपये पाण्यात गेल्याचा आरोप

ठाणे-बेलापूर मार्गावरील ऐरोली रेल्वे स्थानकानजीक एमआयडीसीने दोन कोटी  ९६ लाख रुपये खर्चून उभारलेला स्कायवॉक चुकीच्या ठिकाणी आहे. स्कायवॉकचा नागरिकांसाठी कोणताही उपयोग नसून त्यावर सध्या प्रेमीयुगुलांसाठी आसरा बनल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.

ठाणे-बेलापूर मार्गावरील ऐरोली येथील माइंड स्पेस, अक्षरा तसेच पूर्व आणि पश्चिमेला जाण्यायेण्याकरिता नागरिकांना मोठी कसरत करावी लागत होती. या ठिकाणी रस्ता ओलांडताना अनेक अपघातदेखील झाले होते, तर रोजच या ठिकाणी वाहतूक कोंडीने नागरिक बेजार झाले होते. या ठिकाणाची भविष्यातील वाढती गर्दी लक्षात घेता एमआयडीसीने सुमारे २ कोटी ९६ लाख रुपये खर्चून सहा महिन्यांत स्कायवॉक उभारला आहे. या स्कायवॉकमधून ज्येष्ठ नागरिकांना लिफ्टची सुविधा असून विशेष आकर्षक रोषणाई आहे. या स्कायवॉकमुळे नजीकच्या माइंड स्पेस, अक्षरा या कंपन्यांमध्ये येणाऱ्या कामगारांना आणि स्थानिक नागरिकांना अपघातांपासून बचाव करण्यासाठी मदत होणार होती. मागील आठवडय़ात या स्कायवॉकचे काम पूर्ण झाल्यांनतर एमआयडीसीकडून उद्घाटन करण्यात आले. मात्र स्कायवॉकच्या देखभाल दुरुस्तीसाठी सुरक्षारक्षक नसल्याने या नव्या स्कायवॉकला आतपासून अनैतिक कामांचे जडण लागली आहे.

ऐरोली रेल्वे स्थानकांतून ठाणे बेलापूर मार्गावर येण्याकरिता एकच प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वारानजीक मोठय़ा प्रमाणात रिक्षा व वाहने ये-जा करतात, तर स्कायवॉकचे पूर्वीपासूनच नागरिकांनी हा रस्ता वापरासाठी काढल्याने स्कॉयवाककडे जाण्यासाठी नागरिकांना वळसा घालून जावे लागते. त्यातच बाहेरून आलेल्या नव्या नागरिकांना स्टेशनवरून बाहेर पडल्यांनतर स्कायवॉकला जाण्याकरिता रस्ता बंद असल्याने थेट रस्ता ओलांडून नियोजित स्थळी जावे लागत आहे.

ऐरोली भुयारी मार्गानजीक या स्कायवॉकचे उभारणी करणे आवश्यक असताना केवळ माइंड स्पेस कंपनीच्या प्रवेशद्वारकरिता हा स्कायवॉकचा बळी देण्यात आला. त्यामुळे हा स्कायवॉक शोभेसाठी का बांधला असा सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे. वाहतूक पोलिसांचा हलगर्जीपणा

ऐरोली रेल्वे स्थानकाबाहेर नियोजित रिक्षा स्टॅण्ड असतानासुद्धा वाहतूक पोलिसांच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे थेट पदपथावर विनापरवाना रिक्षा स्टॅण्ड उभारण्यात आले आहे. त्यामुळे रिक्षा पकडण्याच्या कसरतीत या स्कायवॉकचा दुरपयोग होत आहे. ऐरोली रेल्वे स्थानकांत प्रवेश करण्यासाठी त्याचबरोबर सिग्नलच्या ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी कोणताही प्रयत्न न केल्याने या स्कायवॉकचा एमआयडीसीने केलेला खर्च वाया गेला आहे.

ऐरोली भुयारी मार्गानजीक रिक्षाचालकांना बंदी असतानासुद्धा या ठिकाणाहून शॉर्टकटचा पर्याय म्हणून रिक्षाचालक बिनधास्तपणे वापर करत आहे. केवळ रिक्षाचालकांकरिता सिग्नलच्या ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. नियोजित स्कायवॉक बांधण्याचे ठिकाणी परस्पर बदलण्यात आल्याने या स्कायवॉकचा दुरुपयोग होत आहे.

-सुनील गायकवाड, नागरिक.