पालिकेचा अहवाल सादर; पर्यावरण निर्देशांकात सुधारणा

नवी मुंबई २४ तास धडधडणाऱ्या दगडखाणी, शीव-पनवेल व ठाणे-बेलापूर मार्गावर वाढलेली प्रचंड वाहतूक, तळोजा येथील रासायनिक कारखान्यांची हलगर्जीपणा आणि नवी मुंबई विमानतळाच्या बांधकामासाठीचे सुरुंग स्फोट यामुळे नवी मुंबईच्या प्रदूषण पातळीत कमालीची वाढ झाल्याचे हरित लवादाचे म्हणणे असताना या वर्षीच्या पर्यावरण अहवालात मात्र नवी मुंबईतील स्थिती सुधारत असल्याचे अधोरेखित केले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ०.६४ ने प्रदूषण कमी झाल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे. तसेच आरोग्य निर्देशांकातही सुधारणा दिसत आहे. मात्र रहिवाशी क्षेत्रात ध्वनिप्रदूषणाची पातळी मात्र धोक्याचीच दिसत आहे.

मंगळवारी सर्वसाधारण सभेत नवी मुंबई महानगरपालिकेने पर्यावरण स्थिती अहवाल सादर केला. यात पालिकेने विविध पर्यावरण उपक्रम हाती घेतल्याने प्रदूषणाचा धोका कमी झाला असून नवी मुंबई शहर भारतातील पहिले यशस्वी पर्यावरणपूरक शहर बनण्याच्या मार्गावर असल्याचे म्हटले आहे. सांसर्गिक आजारांचे प्रमाण घटले आहे. मात्र पाण्यातून संसर्ग होऊन आजारांचे प्रमाण वाढले आहे.

शांतता क्षेत्रातील सर्व ठिकाणांची ध्वनिप्रदूषण मर्यादा ५० डेसिबल असताना ती सर्व ठिकाणी ओलांडताना दिसत आहे. घणसोली गाव, ऐरोली सेक्टर १८ व १९ येथे ६१ डेसिबल, नेरुळ सेक्टर ९ येथे ६०, वाशी विभागात ५९ डेसिबल ध्वनिप्रदूषण नोंदवण्यात आले आहे. मागील वर्षी ध्वनिप्रदूषण पातळी ही ६५ ते ६९ डेसिबल इतकी होती.

वाहतुकीच्या ठिकाणांवर सरासरी ध्वनिप्रदूषण पातळी ही ६१ ते ६७ डेसिबल एवढी नोंदवण्यात आली आहे. यात महापे पुलावर सर्वाधिक ध्वनिप्रदूषण ६७ डेसिबल, बेलापूर, दिघा, वाशी, जुहूगाव या ठिकाणी ६५ डेसिबल इतकी नोंद झालेली आहे. डी. वाय. पाटील विद्यापीठ नेरुळ सेक्टर ७ येथे ६१ डेसिबल एवढे ध्वनिप्रदूषण नोंदविली आहे.

हरित लवादाच्या निकषांनुसार सुधारणा

एकीकडे केंद्रीय हरित लवाद व राज्य प्रदूषण मंडळाने नवी मुंबईतील प्रदूषणात वाढ झाल्याचे म्हटले आहे. असे असताना पालिकेच्या पर्यावरण अहवालात सुधारणा दिसत आहे. याबाबत पालिका आयुक्तांना विचारले असता, हरित लवादाने कोणत्या निकषांवर शहरात प्रदूषण वाढल्याचे नमूद केले आहे याची तपासणी करून त्यामध्ये सुधारणा करण्यात येतील असे सांगितले.

पालिकेची दिशाभूल?

केंद्रीय हरित लवाद, राज्य प्रदूषण मंडळ आणि पर्यावरणतज्ज्ञ नवी मुंबईतील प्रदूषण पातळी दिवसेंदिवस वाढत असल्याचे सांगत असताना नवी मुंबई पालिकेने मात्र मंगळवारी सादर केलेल्या पर्यावरण विषयक अहवालात प्रदूषण पातळी किंचित कमी होत असल्याचा अहवाल सादर केला आहे. त्यामुळे सर्वानीच आश्र्चय व्यक्त केले आहे.

नवी मुंबई पालिकेने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार शहरातील १८ वा पर्यावरण अहवाल सादर केलेला आहे. या अहवालात हवा, पाणी आणि जमिनीतील प्रदूषण पातळीचा वार्षिक अहवाल सादर केला आहे. पालिका करीत असलेल्या अनेक उपाययोजनामुळे शहरातील प्रदूषण कमी होत असल्याचा दावा करीत आहे. यात सांडपाण्यावरील प्रक्रिया केंद्र आणि घनकचरा व्यवस्थापन उत्तमरीत्या केले जात असल्याचा ढोल वाजवला जात आहे. पालिकेला या सर्व कामासाठी किती पुरस्कार मिळाले याची जंत्री तर नेहमीच जाहीर    केली जात आहे. केंद्र सरकारच्या नगरविकास विभागाने हे शहर देशात राहण्यास दुसऱ्या क्रमांकाच्या पसंतीचे असल्याचा गौरवही केला जात आहे. याच वेळी केंद्रीय हरित लवादाने हे शहर प्रदूषणाबाबत चौथ्या क्रमांकावर असल्याचे जाहीर केले असून राज्य प्रदूषण मंडळाने दोन वर्षांपूर्वी या शहरातील रासायनिक कारखाने २९ टक्के हवेतील प्रदूषण निर्माण करीत असल्याचे विधानसभेत जाहीर केले आहे.

नवी मुंबई विमानतळाच्या सपाटीकरण आणि टेकडीची उंची कमी करण्यासाठी हवेतील प्रदूषण वाढविण्यास हातभारच लागला आहे. याशिवाय शहराच्या मध्य भागाततून जाणारे शीव-पनवेल, ठाणे-बेलापूर मार्ग तसेच जेएनपीटीकडे जाणारा आम्रमार्ग या मार्गावर मोठय़ा प्रमाणात वाहतूक वाढल्याने आवाज व हवेतील प्रदूषण वाढले आहे. या सर्व प्रदूषण वाढविणाऱ्या घटकांमुळे शहरातील ‘पीएम दोन’ या प्रदूषणकारी घटकाचे प्रमाण वाढले

असून ‘कार्बन मोनोक्साइड’ने हिवाळ्यात श्वास घेणे मुश्कील केले आहे.