scorecardresearch

घाऊक व्यापाऱ्यांना नोटिसा; विशेष पथकाद्वारे जप्तीची कारवाईचा एपीएमसीचा इशारा

नियमनमुक्तीचा फायदा घेत अनेक व्यापारी एपीएमसीव्यतिरिक्त इतर ठिकाणी घाऊक व्यापार करीत आहेत.

प्रतिनिधीक छायाचित्र

नवी मुंबई : नियमनमुक्तीचा फायदा घेत अनेक व्यापारी एपीएमसीव्यतिरिक्त इतर ठिकाणी घाऊक व्यापार करीत आहेत. त्यामुळे एपीएमसीच्या उत्पन्नावर परिणाम होत असल्याने आता एपीएमसी प्रशासनाने आशा व्यापारावर कारवाई करण्याचे ठरवले आहे. तशी नोटिसाही प्रशासनाने काढली आहे.

महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३, नियम १९६७ प्रमाणे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची बृहन्मुंबई महानगरपालिका, ठाणे तालुका व रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील तीन गावे हे बाजार समितीचे कार्यक्षेत्र आहे. नियम १९६७ मधील नियम ४ (क), १ (अ) नुसार मुंबई कृषी उत्पन्न बाजार क्षेत्रात कोणताही खासगी घाऊक बाजार चालविता येत नाही. असे असताना आता नियमन मुक्ती कायद्याचा आधार घेत असे बेकायदा घाऊक व्यापार सुरू आहेत. त्यामुळे शेतकरी थेट आपला माल त्या व्यापाऱ्यांना विकत असून व्यापारी एपीएमसीबाहेर घाऊक व्यापार करीत आहे. परिणामी, बाजार समितीची उलाढाल घटत आहे.

मुंबई उपनगरात कुर्ला, साकीनाका, कांदिवली, बोरिवली, भाईंदर, मीरारोड, वसई विरार व मुंबई इत्यादी ठिकाणी घाऊक व्यापार केला जात आहे. त्यामुळे आता एपीएमसीकडून अशा घाऊक व्यापारावर कारवाई करण्याचे ठरवले आहे. यासाठी विशेष पथकही नेमण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी असा बेकायदा घाऊक व्यापार सुरू असेल त्यांना प्रथम नोटीस देण्यात येईल. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

परवाना नसताना थेट घाऊक विक्री केली जात आहे. बाजार समिती स्थलांतर करताना एपीएमसी क्षेत्राबाहेर कोणाताही खासगी घाऊक व्यापार, बाजापेठ नसले. कोणीही घाऊक व्यापार करणार नाही असा करार करण्यात आला होता. मात्र आता उपनगरात घाऊक व्यापार सुरू आहे. आशा व्यापाऱ्यांना आधी नोटीस देण्यात येणार असून तरीही व्यापार सुरूच राहिला तर त्यांच्यावर माल जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे.

– अशोक डक, सभापती, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Notices wholesalers apmc warns confiscation special squad deregulation ysh