नवी मुंबईकर उद्योजकाची कामगिरी
दुधातील आठ प्रकारची भेसळ ओळखता यावी यासाठी नवी मुंबईतील उद्योजकाने तयार केलेल्या ५० लाख दूधपट्टय़ा लवकरच बाजारात येत आहेत. भारतीय जवानांना देण्यात येणाऱ्या दूधपट्टय़ांप्रमाणेच ही सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मुंबईतील १३ हजार औषध दुकानांमध्ये दूधपट्टय़ांचा संच विक्रीसाठी उपलब्ध असेल. एका संचाची किंमत एक हजार रूपये असेल.
दूधाची शुद्धता तपासण्यासाठी भारतीय संरक्षण अन्न व औषध तपासणी प्रयोगशाळेने चार वर्षांपूर्वी दूधपट्टी तयार करण्यात आल्या. ‘पर्ल कॉर्पोरेशन’च्या द्वारकानाथ राठी यांनी या चाचणीपट्टय़ांचे निरीक्षण केल्यानंतर त्या नागरीकांनाही मिळेल यासाठी प्रयत् न सुरू केले. त्यामुळे दुधातील भेसळ घरीच शोधून काढता येणे शक्य होईल, असे सांगून त्यांनी संरक्षण दलाकडे त्याचे स्वामित्त्व हक्क मिळविले.आर्थिक व तांत्रिक सोपस्कर पूर्ण झाल्यानंतर दमण येथे कारखाना उभारून राठी यांनी पहिल्याच प्रयत्नात ५० लाख दूधपट्टय़ा तयार केल्या. त्यांची चाचणी संरक्षण दलास पुरवल्या जाणाऱ्या दुधावर करण्यात आली असून संरक्षण दलाने राठी यांना त्यांच्या ‘टेस्ट ओ मिल्क’च्या किटवर भारतीय सैन्यदलाचे बोधचिन्ह वापरण्याची लेखी परवानगी दिली आहे. या संचाची किंमत एक हजार रूपये असल्याचे राठी यांनी सांगितले.

भेसळीचे रंग उलगडणार..
दुधातील भेसळ ओळखण्याची प्रचलित पद्धती काहीशी किचकट आणि वेळकाढू आहे. त्यामुळे भेसळ करणारे दूधमाफिया तोवर परांगदा झाल्याचे दिसून येतात. राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन अशा दूधपट्टय़ा तयार करण्याचे काम अनेक महिन्यांपासून करत असताना थेट भारतीय संरक्षण दलाची मान्यता घेऊन राठी यांनी बाजी मारली आहे. पाच मिमी पाण्यात दूधपट्टी टाकल्यानंतर पट्टीची वा दूधाच्या रंगात बदल होतो. त्यावरून दुधात मिसळलेला पदार्थ कोणता हे ओळखण्यासाठी ह्य़ा चाचणी संचासह एक तक्ताही देण्यात आला आहे. त्यामुळे आशिक्षित व्यक्तीही ही चाचणी सहज करू शकेल, असा दावा राठी यांनी लोकसत्ताशी बोलताना केला.