एकतर्फी प्रेमातून निर्घृण हत्या झाल्याचे उघड

मरियमचा साखरपुडा दुसऱ्या मुलाबरोबर झाल्याने दोघांमध्ये वाद झाला.

पाम बीच मार्गावर सोमवारी सकाळी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटली

पाम बीच येथे सुटकेसमध्ये मृतदेह सापडल्याचे प्रकरण; तरुणीची सहकाऱ्याकडून हत्या

पाम बीच मार्गावर सोमवारी सकाळी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटली असून मरियम अब्दुल रहिम शेख (२०) असे तिचे नाव आहे. २४ तासांत पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. इम्रान खुद्देश सलमानी (२०) असे त्याचे नाव आहे. एकतर्फी प्रेमातून ही हत्या झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

इम्रानचे मरियमवर एकतर्फी प्रेम होते. मरियमचा साखरपुडा दुसऱ्या मुलाबरोबर झाल्याने दोघांमध्ये वाद झाला. त्या वेळी त्याने तिचा गळा दाबून तिची हत्या केली. सोमवारी करावे गावात सुटकेसमध्ये मृतदेह आढळल्याने नवी मुंबई परिमंडळ १ मधील पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू केला. या वेळी एनआरआय सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार नरवाडे यांना ही मुलगी सीवुड्समधील ‘ग्रेसफुल हेअर कटिंग सलून’ व ‘ब्युटी पार्लर’मध्ये नोकरी करत असल्याचे समजले. त्यानंतर तिची ओळख पटली आणि ती गोवंडीमध्ये राहात असल्याचे स्पष्ट झाले.

पोलिसांनी पार्लरमधील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता याच सलूनमध्ये काम करणाऱ्या इम्रान सलमानीच्या हालचाली संशयास्पद असल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. अंगझडती घेतली असता त्याच्या गळ्यावर व कपाळावर ओरखडे दिसून आले. त्यामुळे संशय बळवला. तपास केला असता त्याने हत्येची कबुली दिली. वाद झाला आणि गळा दाबून तिची हत्या केली, असे त्यांनी सांगितले. त्याने मृतदेह लपवण्यासाठी सुटकेसमध्ये ठेवला. तो मावत नसल्यामुळे शीर धडावेगळे केले, अशी कबुलीही त्याने दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Nri police arrested youth and cracked beautician murder case