इच्छुकांना हुरूप; प्रभाग वाढल्याने उमेदवारी मिळण्याची आशा पल्लवीत

मागील २५ वर्षांत नवी मुंबईची लोकसंख्या ३ लाख ४७ हजारांहून आता १७ लाख ७ हजारांपर्यंत वाढली आहे.

प्रभाग वाढल्याने उमेदवारी मिळण्याची आशा पल्लवीत

नवी मुंबई : गेल्या दीड वर्षांपासून रखडलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी लोकसंख्या वाढीच्या प्रमाणात प्रभागांची संख्या वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे नवी मुंबईतील प्रभागांची संख्या १११ वरून १२२ वर पोहोचणार आहे. त्यामुळे अधिक उमेदवारांना संधी मिळणार असल्याने शहरातील इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. प्रभागांची संख्या वाढणार असल्याने आता नव्याने प्रभाग आखणी करावी लागणार असून त्याकडे लक्ष ठेवून राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जुळवाजुळव सुरू केली आहे.

नवी मुंबई पालिका क्षेत्राची लोकसंख्या मागील दहा वर्षांत सात लाखांनी वाढली असून त्याआधारे पालिकेतील प्रभागांची संख्या १७ टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. प्रभागांची संख्या वाढल्याने गेली अनेक वर्षे पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना निवडणुकीत संधी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

नवी मुंबई पालिकेत ९ मे १९९५ रोजी लोकप्रतिनिधी सत्ता आस्तित्वात आली. त्यावेळी नगरसेवकांची संख्या केवळ ५७ होती. मागील २५ वर्षांत नवी मुंबईची लोकसंख्या ३ लाख ४७ हजारांहून आता १७ लाख ७ हजारांपर्यंत वाढली आहे. त्यामुळे दर दहा वर्षांनी नवी मुंबईतील नगरसेवक संख्या वाढलेली आहे. करोना साथीमुळे २०२१ मध्ये होणारी देशव्यापी जनगणना कार्यक्रम लांबणीवर पडला. मात्र, वाढलेल्या लोकसंख्येचा अंदाज बांधून राज्यातील सर्व पालिका व नगरपालिकातील लोकप्रतिनिधींची संख्या वाढविण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे.

प्रभागांची संख्या वाढल्याने आता प्रभाग रचनेचा कार्यक्रम नव्याने राबवावा लागणार असून या आखणीदरम्यान अनेक विद्यमान नगरसेवकांच्या प्रभावक्षेत्राला धक्का बसण्याची चिन्हे आहेत. वाशी सारख्या मध्यवर्ती उपनगरातील नगरसेवकांची कमी करण्यात आलेली संख्या पुन्हा पूर्ववत होण्याची शक्यता आहे.  त्याचप्रमाणे गेल्या दहा वर्षांत नव्याने नागरी वस्ती वाढलेल्या नेरुळ, सीवूड्स, घणसोली या भागांत प्रभागांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता प्रभागांची आखणी कशी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रभाग ४० की ४१?

महापालिकेची ही निवडणूक बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार आहे. पूर्वी १११ नगरसेवकांची संख्या असताना प्रत्येकी तीन याप्रमाणे ३७ प्रभाग बनणार होते. मात्र, आता प्रभागांची संख्या ४० होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये दोन प्रभाग चार सदस्यांचे आणि ३८ प्रभाग तीन सदस्यांचे अशी रचना होऊ शकते. याशिवाय प्रत्येकी तीन नगरसेवकांचे ४० प्रभाग आणि एक प्रभाग दोन नगरसेवकांचा अशी ४१ प्रभागांची रचना करण्याचा पर्यायही आहे. मात्र, अद्याप पालिकेतील सूत्रांकडून त्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

सदस्य संख्याही वाढण्याबाबत राज्य सरकारने निर्णय घेतला असला तरी याबाबत अध्यादेश आलेला नाही. अध्यादेशानंतरच याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे. -अमरिश पटनिगिरे, उपायुक्त व निवडणूक अधिकारी नवी मुंबई महपालिका

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नवी मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Number of wards in proportion to population growth for navi mumbai municipal corporation elections akp

Next Story
उरणमध्ये एनएमएमटी बस पास वितरण सुविधा देण्याची मागणी
ताज्या बातम्या