नवी मुंबई : गेल्या आठवडय़ात नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी पालिका प्रशासनाने ओबीसी आरक्षणासह काढण्यात आलेल्या सोडतीवर दिलेल्या मुदतीत केवळ एक हरकत पालिका प्रशासनाकडे प्राप्त झाली आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या सहाव्या निवडणुकीसाठीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. प्रभाग आरक्षण अंतिम केल्यानंतर मतदार यादीही अंतिम करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ३१ मे रोजी ओबीसी आरक्षण वगळून आरक्षण सोडतही काढण्यात आली होती. मात्र न्यायालयाने बांठिया आयोगाचा अहवाल स्वीकारल्यानंतर नवी मुंबईत २५.५ टक्के ओबीसी आरक्षण लागू करण्यात आले आहे. त्यानुसार यापूर्वी काढण्यात आलेली आरक्षण सोडतीतील अनुसूचित जाती व जमातीचे आरक्षण कायम ठेवत गेल्या आठवडय़ात शुक्रवारी २९ जुलै रोजी विष्णुदास भावे नाटय़गृहात आरक्षण सोडत काढण्यात आली होती. अनुसूचित जातीच्या प्रवर्गासाठी ११ तसेच अनुसूचित जमातीच्या प्रवर्गासाठी २  जागा यापूवीच आरक्षित करण्यात आल्या होत्या. त्या कायम ठेवत शुक्रवारी काढण्यात आलेल्या सोडतीत नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी २५ पैकी १३ जागा महिलांसाठी तर खुल्या गटासाठी ८४ पैकी ४१ जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या होत्या. शनिवारी या आरक्षणाचे प्रारूप पालिका प्रशासनाने प्रसिध्द करीत यावर हरकती व सूचना सादर करण्यासाठी मंगळवारी दुपारी ३ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली होती. यापूर्वी काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीवर १२ हरकती नोंदवण्यात आल्या होत्या. यात वाढ होईल अशी शक्यता होती. मात्र दिलेल्या मुदतीत केवळ एक हरकत प्रशासनाकडे प्राप्त झाली आहे.