scorecardresearch

मत्स्य विभागाकडून विविध परवान्यांसाठी मच्छीमारांची अडवणूक

करंजा परिसरातील मच्छीमार मासेमारीसाठी समुद्रात गेल्यानंतर त्यांच्या बोटी भर समुद्रात अडवून अनेक परवान्यांची मागणी केली जात असल्याने मच्छीमारांनी संताप व्यक्त केला आहे.

Fishing crisis over construction of new bridge over Vashi Bay

मच्छीमारवर्गातून संताप व्यक्त

उरण : करंजा परिसरातील मच्छीमार मासेमारीसाठी समुद्रात गेल्यानंतर त्यांच्या बोटी भर समुद्रात अडवून अनेक परवान्यांची मागणी केली जात असल्याने मच्छीमारांनी संताप व्यक्त केला आहे. एकीकडे मासेमारी हा व्यवसाय आतबट्टय़ाचा होऊ लागला असताना मत्स्यव्यवसाय विभागाकडून बोटी अडवून त्रास दिला जात असल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे. अशा प्रकारे मच्छीमार बोटींना करण्यात येणारा अडथळा बंद करण्याचीही मागणी येथील मच्छीमारांकडून केली जात आहे.

मच्छीमार व्यवसायावर अनेक बंधने घालणारा मत्स्यव्यवसाय अधिनियम २०२१ लागू केला आहे. त्यामुळे मासेमारी करणेही अवघड झाल्याने आधीच मच्छीमारांमध्ये नाराजी आहे. त्यातच मच्छीमारीसाठी जाणाऱ्या व मासेमारी करून येणाऱ्या मासेमारी बोटींना अडवून त्यांची तपासणी केली जात आहे. यावेळी मच्छीमारांना अनेक परवान्याची मागणी केली जात आहे. मत्स्यव्यवसाय विभागाने त्यांच्या नियमांचे पालन जरूर करावे, आम्ही त्यांना सहकार्य करण्यास तयार असून मच्छीमारांना मासेमारीला त्रास होईल अशा प्रकारचा व्यवहार करू नये, असे मत करंजा येथील मच्छीमार विनायक पाटील यांनी व्यक्त केले आहे.

मत्स्यव्यवसाय परवाना विभागाकडून गस्त घालून नियमानुसार मासेमारी केली जात आहे हे पाहिले जाते. विनाकारण कोणत्याही बोटींना अडविण्यात येत नसून  ट्रॉलरचा परवाना असताना पर्ससीन जाळी (नेट) चा वापर होतो का? याची तपासणी केली जाते. ज्या मच्छीमार बोटीकडून नियमांचा भंग केला जातो, त्यांच्यावर कारवाई केली जात असून ही गस्त त्यासाठीच घातली जात असल्याची माहिती उरण येथील मत्स्यव्यवसाय परवाना अधिकारी सुरेश बहुलगावे यांनी दिली.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Obstacle fishermen various licenses fisheries department outraged ysh