Officials of Kharland Division inspect agricultural land adjacent to Khopta Bay in Uran which is damaged by sea water navi mumbai | Loksatta

उरणमधील समुद्रामुळे उध्वस्त होणाऱ्या शेतीची खारभूमीकडून दखल; शेती वाचविण्यासाठी उपाययोजना करणार

दोन भगदाडामुळे समुद्राच्या भरतीच्या वेळेस मोठ्या प्रमाणात पाण्याचा लोंढा शेतीमध्ये येतो. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे. खाडीचे पाणी शेतीमध्ये शिरले की चार वर्षे तरी या शेतामध्ये पिक उगवत नाही.

उरणमधील समुद्रामुळे उध्वस्त होणाऱ्या शेतीची खारभूमीकडून दखल; शेती वाचविण्यासाठी उपाययोजना करणार
उरणमधील समुद्रामुळे उध्वस्त होणाऱ्या शेतीची खारभूमीकडून दखल

उरण येथील खोपटा खाडी लगत असलेल्या शेकडो एकर जमिनीत समुद्राच्या भरतीचे पाणी शिरत आहे. त्यामुळे या जमिनी आणि परिसरातील मिठागरेही नष्ट होऊ लागली आहेत. याचे वृत्त प्रसिद्ध होताच शनिवारी खारलँड विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने या परिसरातील शेती आणि बंदिस्तीची पाहणी केली आहे. त्यानुसार उपाययोजना करण्यात येणार असल्याचे मान्य केले आहे.

हेही वाचा- राहण्याजोग्या शहरात नवी मुंबईकरांना मिळतेय अशुद्ध हवा; अतिखराब हवेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम

उरण तालुक्यातील हजारो एकर शेती सिडको आणि खाजगी विकासकांनी विकत घेऊन अर्ध्यापेक्षा अधिक पिकती शेती संपूष्टात आणली आहे. तर दुसरीकडे पूर्व भागातील उर्वरीत शेत जमीनही खारभूमीच्या आणि मिठागराच्या फुटक्या बांध बंदिस्तीमुळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. उरण तालुक्यातील खोपटे गावजवळील ही खार बंदिस्ती फुटलेली आहे. याबाबत सुरूवातीला खारभूमीचे अधिकारी ही फुटलेली खार बंदिस्ती मिठागर विभागाची असल्यामुळे आम्हाला त्याचे काम करता येत नसल्याचे सांगून जबाबदारी झटकण्याचे काम करत होते. मात्र शनिवारच्या पहाणीत खारभूमीच्या खार बंधिस्तीलाच दोन ठिकाणी भल्या मोठ्या खांडी गेल्याचे निदर्शनास आले. यापैकी एक भगदाड(खांड) जवळ जवळ १०० मिटरची असून दुसरे २५ मीटर रुंदीचे असल्याचे दिसून आले.

हेही वाचा- नवी मुंबई: वाहनचालकांचे वेगावर नियंत्रण राहण्यासाठी महापालिकेने लढवली अनोखी शक्कल

या दोन भगदाडामुळे समुद्राच्या भरतीच्या वेळेस मोठ्या प्रमाणात पाण्याचा लोंढा शेतीमध्ये येतो. आणि हे पाणी गोवठणे, पिरकोन,पाणदिवे, कोप्रोली, पाले आणि खोपटे येथिल गावातील हजारो एकर शेतीमध्ये पसरले आहे. आत्ता तर हे पाणी खोपटे गावाच्या घरापर्यंत पोहचले आहे. त्यामुळे या भागातील हजारो एकर शेती नापिकी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. एकदा खाडीचे पाणी शेतीमध्ये शिरले की चार वर्षे तरी या शेतामध्ये पिक उगवत नाही तसेच या पाण्यासोबत वाहून आलेल्या खारफुटीच्या बियांमुळे शेतात खारफुटी उगवते आणि नंतर ही खारफुटी तोडणे देखिल अडचणीचे ठरते.

हेही वाचा- उरण : सततच्या आगींमुळे उरणमधील वनसंपदा व सजीव सृष्टीचे होतेय नुकसान

खारभूमीचे कनिष्ठ अभियंता संजय जाधव यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत हा पहाणी दौरा केला. ज्या ठिकाणी खांडी गेल्या आहेत त्या ठिकाणी पोहचण्यासाठी रस्ता नसल्याने या अधिकाऱ्यांना होडीने येथे जावून पहाणी करावी लागली. यावेळेस या ठिकाणी दोन खांडी पडलेल्या असून येथे असलेल्या उघाडी देखिल फुटल्या असल्याचे निदर्शनास आले. असल्याची माहिती खोपटे येथील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत ठाकूर यांनी दिली आहे. तसेच या समस्येवर कायम स्वरूपी उपाय म्हणून खोपटे पासून गोवठणे-आवरे पर्यंत कोस्टल रोड बनवून कायम स्वरूपी खाडी चे संरक्षण करण्याची मागणी केली आहे. या परिसरातील बंदिस्तीचे नुकसान झाले असून त्याची दुरुस्ती करणे अवघड आहे. मात्र बंदिस्तीच्या दुरुस्तीसाठी उपाय केल्या जातील अशी माहिती खारभूमीचे कनिष्ठ अभियंता संजय जाधव यांनी दिली.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-12-2022 at 20:14 IST
Next Story
राहण्याजोग्या शहरात नवी मुंबईकरांना मिळतेय अशुद्ध हवा; अतिखराब हवेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम