पनवेल : नागरिकांचे प्रश्न वारंवार मागणी करूनही सुटत नसल्याने प्रशासनातील अधिकारीही हतबल झाल्याचा प्रत्यय बुधवारी शिवसेनेच्या जनता दरबारात आला. नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर सिडकोच्या एका अधिकाऱ्याने त्यांना मोर्चा घेऊन या असे उत्तर दिल्याने सर्वच आवक झाले.
पनवेल महापालिकेचे प्रभाग रचनेचे प्रारूप जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शिवसेनेने कामोठेनंतर त्यानंतर बुधवारी खांदेश्वर वसाहतीत जनता दरबार आयोजित केला होता.

यात सिडको, पालिका, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनाही बोलावण्यात आले होते. या दरबारात पालिका व सिडकोच्या पाणपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी मात्र हजर राहणे टाळले. या दरबारात नागरिकांनी, पाणी, वीज समस्या तसेच येथील काही नागरी प्रश्न सुटत नसल्याच्या तक्रारी मांडल्या. खांदेश्वर वसाहतीमधील भुयारी रस्त्याच्या दयनीय अवस्थेबद्दल एका ज्येष्ठ नागरिकाने व्यथा मांडली. यावर सिडकोचे अभियंता टेकाडे यांनी सिडको कार्यालयावर मोर्चा आणा असे उत्तर दिले. या वेळी त्यांनी आपण वरिष्ठांकडे याबाबत सांगून वैतागलो असल्याची हतबलताही व्यक्त केली.
या वेळी येथील उत्कर्ष सोसायटीच्या प्रतिनिधींनी गेल्या दीड़ वर्षापासून अवघे २० मिनिटेच पाणी येत असल्याची तक्रार मांडली. मात्र या वेळी सिडको व पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारीच उपस्थित नव्हते.

पाणी समस्यावर उत्तर देताना एमजेपीचे अधिकारी पांढरपट्टे यांनी एमजेपीकडून पुरेसे पाणी दिले जाते मात्र पाण्याचे योग्य नियोजन होत नसल्याची बाब या वेळी मांडली. शिवसेनेचे पनवेलचे जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या मागणीनंतर हा जनता दरबार खांदेश्वरमध्ये आयोजित केला होता.