संगणकीय खेळ, व्हिडीओ गेम्स आणि मोबाइल अ‍ॅप्स व कार्टून मालिकांनी भारतीय बालमनावर गारूड केले असताना ‘जुने ते सोने’ म्हणत ऐरोली सेक्टर दहामधील मैदानावर रविवारी आपल्या जुन्या खेळांची ओळख करून दिली जाणार आहे. यामध्ये पकडापकडी, लपाछपी, विटी-दांडू, डब्बा ऐसपैस, गोटय़ा, आंधळी कोशिंबीर, डोंगराला आग लागली, तळ्यात-मळ्यात, संत्रा-लिंबू, आम्ही तुमच्या पाण्यात, आटय़ापाटय़ा, रुमाल उडवी, पतंगबाजी, चाकाची चक्री, आबाधुबी, खांब पकडी, सागरगोटे, अटक मटक अशा पारंपरिक खेळांचा समावेश असून प्राचीन काळातील मोक्षपट, चल्लसआठ, बागचाल, सातगोल, चौपर,या खेळांची ओळखही करून दिली जाणार आहे.
अनेकांना जुन्या बैठय़ा खेळांची माहिती नाही आणि मुलांना मैदानी खेळ खेळायला मैदाने नाहीत अशा द्विधा मन:स्थितीत अडकलेल्या नव्या पिढीला आपला (आपुलकीच्या परिसंवादातील लाभ) कट्टा या संस्थेने जुन्या खेळांचा खजिना शोधून आणला आहे. रविवार २७ डिसेंबर रोजी सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत ऐरोली सेक्टर दहामधील डीएव्ही शाळेच्या मैदानात या खजिन्याची पोतडी खुली केली जाणार आहे. टीव्ही, संगणक, मोबाइलवर पाहिल्या जाणाऱ्या बालमालिकाही केवळ हिंसा, द्वेष, मत्सर आणि कुरघोडी दाखवीत असल्याचे आज दिसून येते आहे. या खेळांमुळे शरीराचा व्यायाम तर लोप पावला आहेच पण मनांवर होणारे संस्कार प्रदूषित झाले आहेत. त्यासाठी जुने ते सोने असणारे मैदानी व बैठय़ा खेळात एक आशय लपल्याची जाणीव ‘आपला कट्टा’ने करून देण्यास सुरुवात केली असून या खेळांचा प्रचार आणि प्रसार ते ठिकठिकाणी जाऊन करीत आहेत. त्यासाठी ममता भोसले सर्वप्रथम पालक आणि पाल्यांच्या समस्यांवर समुपदेशन करीत असून मुलांच्या सर्वागीण विकासासाठी जुन्या पारंपरिक खेळांचे महत्त्व विशद करून सांगत आहेत. जुन्या आणि आता काही प्राचीन खेळांचा त्यासाठी अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. पंकज भोसले आणि मोहन हिंदळेकर आणि त्यांचे सहकारी खेळांचे प्रात्याक्षिक दाखवून मुलांकडून हे खेळ करून घेत आहेत. पारंपरिक खेळातील प्रत्येक खेळ हा शारीरिक जडणघडण करणार असल्याचे मत भोसले यांनी व्यक्त केले. विटी-दांडू हा खेळ एकाग्रता वाढवतो. गोटय़ा खेळ हा मुलाच्या हाताचा व्यायाम करून घेतो तर आटय़ापाटय़ातील धावणे, चकवणे शिकवतो. अशा प्रत्येक जुन्या खेळाचा एक फायदा असल्याचे दिसून येते. या खेळाबरोबरच मोक्षपट हा संत ज्ञानदेव महाराजांच्या काळापासून खेळत आलेला खेळ आध्यात्मिक शिकवण देणारा आहे. कवडय़ा व लाकडे फासे यांच्या साहाय्याने या खेळाची आखणी करण्यात आली आहे. नवंकारी हा बैठा खेळ पाश्चात्त्य देशात नाइन मेन मॉरल नावाने ओळखला जात असून दोन खेळाडूंमध्ये खेळला जाणारा हा खेळ मुलांचे भविष्यातील नियोजन विकसित करण्यास हातभार लावत आहे. या खेळातील दोन खेळांडूकडे नऊ खडे दिले जातात आणि त्यासाठी तयार करण्यात आलेल्या विशिष्ट फलकावर हा बैठा खेळ खेळला जातो. प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या नावाने ओळखला जाणारा चल्लस आठ किंवा चौका बारा खेळ आता लुडो नावाने प्रचलित झाला आहे. मात्र, या खेळाचा शोध फार पूर्वी आपल्या देशात लागला आहे. म्हैसूरमधील चामुंडेश्वरी मंदिरात बागचाल या खेळाचे संदर्भ आढळून आले असून जुन्या मंदिर अथवा वास्तूत या खेळाचे पट दगडावर कोरलेले दिसून येतात. चार वाघ आणि वीस बकऱ्यांचे प्रतीकात्मक रूप घेऊन हा खेळ खेळला जातो.
अधिक माहितीसाठी ९८२१००९१३७, ९८१९२७३२३५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Thane Housing Court
ठाणे हाऊसिंग अदालतीत तक्रारदारांना दिलासा, प्रलंबित १२० पैकी ११० तक्रारींवर निर्णय
dombivli shilphata road marathi news, shasan aplya dari dombivli marathi news
डोंबिवली : शिळफाटा रस्ता रविवारी अवजड वाहनांसाठी बंद, शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी वाहतूक विभागाचा निर्णय
Selection of two players from the police disha program for the national football tournament Pune news
गुन्हेगारी मार्गावर भरकटलेल्या मुलांना मिळाली ‘दिशा’; पोलिसांच्या दिशा उपक्रमातील दोन खेळाडूंची राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड
Saima ubaid First female powerlifter from Kashmir
सायमा ओबेद… कश्मिरमधील पहिली महिला पॉवरलिफ्टर