नवी मुंबई: ब्लॅक स्पॉट ठिकाणी सायकल ट्रॅक हवाच का? | On behalf of the Municipal Corporation a cycle track has been started on Palm Beach Road which has a black spot amy 95 | Loksatta

नवी मुंबई: ब्लॅक स्पॉट ठिकाणी सायकल ट्रॅक हवाच का?

अपघात प्रवण क्षेत्रात पाम बीच मार्ग आघाडीवर

नवी मुंबई: ब्लॅक स्पॉट ठिकाणी सायकल ट्रॅक हवाच का?
ब्लॅक स्पॉट ठिकाणाममध्ये पाम बीच मार्ग आघाडीवर असून देखील या जीवघेण्या मार्गाला खेटूनच महापालिकेच्या वतीने सायकल ट्रॅक सुरू करण्याचा घाट

नवी मुंबई उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या ब्लॅक स्पॉट ठिकाणाममध्ये पाम बीच मार्ग आघाडीवर असून देखील या जीवघेण्या मार्गाला खेटूनच महापालिकेच्या वतीने सायकल ट्रॅक सुरू करण्याचा घाट घालण्यात आला आहे. परंतु नवी मुंबईतील सर्वात मोठा अपघात प्रवणक्षेत्र असलेल्या पामबिच मार्गावर होत असलेल्या सायकल ट्रॅक बाबत आरटीओ विभाग तसेच शहरातील नागरिकांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा >>>नवी मुंबई: ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२३’ अंतर्गत स्वच्छताकर्मीही होत आहेत आपत्ती व्यवस्थापनात प्रशिक्षित

नवी मुंबईतील पामबीच मार्ग हा वाहन चालकांचा पसंतीचा रस्ता असून भरधाव वाहनांसाठी सुपरिचित होत आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांचे अपघाताचे प्रमाण देखील या रस्त्यावर अधिक आहे. त्यामुळे तत्कालीन आयुक्त अभिजीत बांगर यांनी या रस्त्यावर होणारे अपघात हा चिंतेचा विषय असून या अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या दृ्ष्टीने वाहतुक पोलीस विभागासमवेत बैठक घेऊन उपयोजना करण्याबाबत चर्चा करण्यात आली. आतापर्यंत आरटीओ विभागाकडून शहरातील ठाणे-बेलापूर महामार्गावर तसेच इतर रस्त्यांवरील अधिक भरधाव वाहनांवर कारवाई करण्यात आलेली आहे . नोव्हेंबर पर्यंत ५४१३ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून ठाणे बेलापूर महामार्गासह पाम बीच मार्गावर भरधाव वाहनांची संख्या अधिक आहे. या पाच हजार भरधाव वाहनांपैकी ६० ते ७० टक्के प्रमाण हे पाम बीच मार्गावरील आहे. या पामबीच मार्गाला खेटूनच सायकल ट्रॅक बनवण्यात येत आहे. परंतु नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे या ठिकाणी सुरू केलेल्या सायकल ट्रॅकचा फायदा हे केवळ सायकलपटूंना होईल त्या व्यतिरिक्त नागरिकांसाठी याचा वापरच होणार नाही असे मत नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे. जर हा सायकल ट्रॅक नागरीवस्ती ते रेल्वे स्थानक परिसरालगत जोडण्यात आला असता तर याचा फायदा सर्वसामान्य जनतेला घेता आला असता, अशीही चर्चा सुरू आहे. पामबीच मार्गावर नित्यानेच अपघातांच्या घटना घडत असतात, अशा अपघात प्रवण क्षेत्रामध्ये महानगरपालिका नागरिकांच्या जीवावर बेतण्याची शक्यता असणारा हा सायकल ट्रॅक प्रकल्प का करत आहे? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

हेही वाचा >>>उरण: नवघर उड्डाणपुलावर खड्डे, अंधार आणि झाडे झुडपे; अपघाताची शक्यता

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने पाम बीच मार्गालगत हा सायकल ट्रॅक बनवण्यात येत आहे . परंतु हा ब्लॅक स्पॉटमध्ये येत आहे. तसेच या मार्गावरील भरधाव वाहनांची संख्याही अधिक आहे . त्यामुळे या ठिकाणी होत असलेला सायकल ट्रॅक ही बाब चिंताजनक आहे.-हेमांगी पाटील , उपप्रादेशिक अधिकारी , आरटीओ

शहरातील पामबीच मार्गालगत सायकल ट्रॅक उभारण्याचे काम सुरू आहे. परंतु सायकल ट्रॅक सर्वसामान्यांसाठी उपयोगी ठरणार नसून फक्त सायकलपटूंनाच याचा उपयोग होईल. शिवाय पामबीच मार्ग लगतच हा ट्रॅक सुरू करत असल्याने भविष्यात अपघातांची दुर्घटना घडू शकते. त्याचबरोबर नागरिकांच्या जीवावर ही बेतण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील इतर ठिकाणी हा सायकल ट्रॅक बनवावा अशी मागणी केली होती.-समीर बागवान ,माजी परिवहन समिती सदस्य.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-11-2022 at 21:08 IST
Next Story
नवी मुंबई: ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२३’ अंतर्गत स्वच्छताकर्मीही होत आहेत आपत्ती व्यवस्थापनात प्रशिक्षित