नागरी समस्यांचा सामना करण्यासाठी रहिवाशांचा पुढाकार

रस्ते, वीज, गटार, मलनि:सारणवाहिन्या याकडे सातत्याने दुर्लक्ष करणाऱ्या सिडको व पालिकेशी संघर्ष करण्यासाठी घणसोली सेक्टर २१ मधील ३६ सोसायटींनी एकत्र येऊन एक सेक्टर एक गणपती संकल्पना राबविली आहे. यानिमित्ताने या भागातील रहिवासी एकवटले असून केवळ गणेशोत्सवच नाहीत, तर नवरात्र, होळी यासारखे सणही हे राहिवासी एकत्र साजरे करीत आहेत. विशेष म्हणजे यासाठी लागणारी वर्गणी वर्षांतून एकदाच काढली जात आहे.

लोकमान्य टिळकांनी ब्रिटिशांच्या विरोधात जनजागृती व्हावी यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची संकल्पना राबवली. तो हेतू आता अनेक ठिकाणी खुंटीला टांगला जात असला, तरी घणसोलीसारखे एक ठिकाण याला अपवाद आहे. येथील सेक्टर २१ मध्ये सिडकोने प्रकल्पग्रस्तांना साडेबारा टक्के योजनेतील भूखंड वितरित केले. हे भूखंड वितरित करताना सिडकोने विकसित भागात देण्याचे आश्वासन प्रकल्पग्रस्तांना दिलेले आहे. त्यासाठी विकास शुल्क व एकूण भूखंडातील पावणेतीन टक्के भाग वजा करून घेतला जात आहे, मात्र घणसोलीतील सेक्टर २१ हे सेक्टर याला अपवाद आहे. सिडकोने या ठिकाणी अनेक सुविधा न दिल्याने रहिवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. यात मलनि:सारणवाहिन्या तुंबल्यानंतर होणारा त्रास आणि येणारी दरुगधी ही नरकयातना देणारी आहे. या संदर्भात सिडकोकडे येथील रहिवाशांनी अनेक वेळा पत्रव्यवहार केला पण त्याला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे येथील रहिवासी शहरात असून नसल्यासारखे आहेत. सिडकोकडून हा भाग हस्तांतरित न झाल्याने पालिका या ठिकाणी एक पैसा खर्च करीत नाही. त्यामुळे हस्तांतरण प्रक्रिया सुरू आहे असे सिडकोचे अधिकारी सांगतात, तर हस्तांतरण झाल्याशिवाय आम्ही एकही सुविधा देणार नाही अशी पालिकेची भूमिका आहे. या दोन प्रधिकरणांच्या भांडणात येथील रहिवाशांनी स्वस्तात घरे विकण्यास सुरुवात केली आहे. या समस्यांचा सामना करण्यासाठी येथील सर्व रहिवासी एकत्र येऊन त्यांनी सार्वजनिक उत्सवांसाठी घणसोली वेलफेअर फाऊंडेशनची स्थापना केली असून एक सेक्टर एक गणपती संकल्पना राबविली आहे. त्याला उत्तम प्रतिसाद मिळत असून नवी मुंबईत बेलापूरजवळील आग्रोली गावात गेली ६८ वर्षे एक गाव एक गणपती संकल्पना राबविण्यात आली आहे.

सेक्टरमधील समस्यांचा सामना करण्यासाठी सर्व रहिवासी गेली अनेक वर्षे सिडकोबरोबर संघर्ष करीत आहेत. यातून ही एक सेक्टर एक गणपती संकल्पना अमलात आली असून गणपती सिडकोला सद्बुद्धी देईल अशी अपेक्षा आहे.

-महेश पाटील, सहखजिनदार, घणसोली वेलफेअर फाऊंडेशन.