शहरात एकेरी वाहतूक सुरू; कृषी उत्पन्न बाजार स्थलांतराचे संकेत

पनवेल : शहरात वाहतूक कोंडी ही गंभीर समस्या असून ती दूर करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी १८ वर्षांपूर्वी शहरातील तीन वेगवेगळ्या मार्गिकांवर एकेरी वाहतूक केल्याच्या अधिसूचनेची अंमलबजावणी सोमवारपासून सुरू केली आहे. तसेच जड वाहनांमुळे वाहतूक कोंडीत भर पडत असल्याने येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स्थलांतराबाबतही चर्चा सुरू आहे.

गेल्या आठवडय़ात भारतीय जनता पक्षाने पनवेल शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी बैठक घेतली. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मुख्य उपस्थितीत झालेल्या बैठकीत आमदारांनी भविष्यात कोंडीमुक्त पनवेलसाठी शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती अन्य ठिकाणी हलविण्याचा विचार वाहतूक सल्लागार समितीला करावा लागेल, मुबलक वाहनतळ पालिकेला उभारावे लागेल अथवा जेथे आहे तेथेच कृषी उत्पन्न बाजार समिती ठेवल्यास घाऊक व्यापाऱ्यांच्या जड वाहनांनी किती मेट्रिक टन वजनाचे वहन करावे याचा निकष ठरविण्याची वेळ आल्याचे बैठकीत म्हटले होते. त्यामुळे पनवेलमधील कृषी उत्पन्न बाजार समिती हलविणार का, असा नवीन प्रश्न निर्माण झाला आहे. करोनाकाळात सामाजिक अंतराच्या नियमनासाठी हाच बाजार खांदेश्वर येथील मोकळ्या मैदानात काही दिवसांसाठी हलविण्यात आला होता.

सोमवारपासून शहरातील विविध मार्गिकांवर एकेरी वाहतुकीचा २००३ च्या नियमांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली.  यामध्ये उरणनाका ते टपाल नाका या मार्गिकेवर वाहतुकीस बंदी असणार असून सोमवारपासून वाहतूक विभागाने येथे चार कर्मचारी व एका अधिकाऱ्यांची नेमणूक केली. गेली अनेक वर्षे अपुरे मनुष्यबळाचे कारण देत आणि व्यापाऱ्यांच्या रोषाचा सामना कोणी करायचा हे कारण देऊन वाहतूक व स्थानिक पोलिसांमुळे नियमबाह्य़ वाहतूक पनवेलमध्ये सुरू होती.

कोंडीमुक्त पनवेल हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता पोलीस अधिकारी अजयकुमार लांडगे आणि वाहतूक विभागाचे संजय नाळे यांनी पुढाकार घेतला असून सोमवारी सकाळपासून एकेरी वाहतुकीचा नियम पाळण्यात आला. सोमवारपासून तेथे पोलीसही तैनात असल्याचे दिसले. त्यामुळे पनवेलची वाहतूक कोंडीतून सुटका होणार असल्याची चर्चा आहे.

आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुढाकार घेत वाहतूक पोलीस, व्यापारी, पालिकेचे सदस्य, पालिकेचे अधिकारी आणि वाहतूक व स्थानिक पोलिसांची गेल्या आठवडय़ात शुक्रवारी बैठक आयोजित केली. या बैठकीत विविध उपाययोजना प्रायोगिक तत्त्वावर राबविण्याचे सुचविण्यात आले. याशिवाय पोलीस, परिवहन विभाग, पालिका अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांचा संयुक्त पाहणी दौरा ठरविण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून पनवेल शहरातील वाढती वाहनसंख्या, बेशिस्त वाहतूक ही मोठी समस्या पुढे येत आहे. पालिकेच्या परिवहन विभागासाठी नेमलेल्या खासगी सल्लागार क्रिसील कंपनीच्या प्रतिनिधीने शहरातील परिवहनाविषयी माहिती दिली. त्यामध्ये शहरात व्यापारी कारणासाठी बाहेरून येणाऱ्या जड वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत असल्याचे मुख्य कारण सांगण्यात आले. मात्र व्यापाऱ्यांनी हलकी वाहने उपलब्ध होत नाहीत व परवडत नसल्याचे या वेळी सांगितले. कोंडी दूर करण्यासाठी जड वाहने रात्रीच्या वेळी शहरात आणण्याचा पर्याय सुचविण्यात आला. मात्र रात्रपाळीचे मनुष्यबळ उपलब्ध होऊ  शकत नसल्याकडे व्यापाऱ्यांनी लक्ष वेधले.

शहरातील ७६ रिक्षा थांब्यांवर बेशिस्तपणे रिक्षा उभ्या असल्यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याची बाब पालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी निदर्शनास आणून दिली. त्यामुळे परिवहन विभागाने रिक्षा थांब्यांना परवानगी देताना कोणते नियम पाळलेत व भविष्यात हेच थांबे कोंडीची ठिकाणे होऊ  नये यासाठी पालिका अधिकारी, पोलीस आणि परिवहन अधिकाऱ्यांनी एकत्रित पाहणी करण्याची सूचना या बैठकीत केली आहे. शहरातील लाइन आळीतील रस्त्यावरील कोंडीचे मुख्य कारण तेथील दुतर्फा उभी असणारी वाहने असल्याचे कारण पालिका सदस्य रुचिता लोंढे यांनी सांगितले. तसेच नवीन पनवेल वसाहतीमध्ये मोठय़ा बसेस उभ्या असतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याची तक्रार पालिका सदस्य प्रकाश बिनेदार यांनी केली. पनवेल अतिरिक्त जिल्हा न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर रिक्षा उभ्या केल्या जात असल्याने तेथील रिक्षा थांबा हलवून अन्य ठिकाणी जागा देण्याची सूचना पालिका सदस्य अ‍ॅड. मनोज भुजबळ यांनी केली.

पोलिसांचे वाहतूक नियोजन

’ टपाल नाका ते पंचरत्न नाका प्रायोगिक तत्त्वावर एकेरी करावा,

’ शहरातील रोटरी चौक पालिकेने तत्काळ काढून टाकावे

’ रस्त्यावरील फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावर कारवाई होणे गरजेचे

’ दुकानदारांनी बळकावलेल्या समासिक जागांमुळे रस्ते अरुंद झाले आहेत. अनियंत्रित बांधकामावर पालिकेने तातडीने कारवाई करावी.

’ अवजड व जड वाहनांना शहरात परवानगी देताना नियम करावेत

’ बेशिस्तपणे रिक्षा उभ्या करणाऱ्यांवर कारवाई करावी

’ खड्डे भरून काढण्यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारावी

’ बाजारातील मुख्य चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत

पनवेल शहरात सोमवारपासून एकेरी वाहतूक सुरू केली आहे.