३७ टक्के विद्यार्थ्यांची बँक खातीच नसल्याने अडथळे
नवी मुंबई : ऑनलाइन वर्गात पालिका शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वाढावी यासाठी नवी मुंबई महापालिका प्रशासनाने ‘नेट पॅक’ योजना जाहीर करून दोन महिने झाले. मात्र अद्याप विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा झालेली नाही. ३७ टक्के विद्यार्थ्यांची बँकेत खाती नसल्याने ही रक्कम जमा न केल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात येत आहे.

करोनामुळे गेल्या वर्षभरात शाळा बंद होत्या. त्यामुळे ऑनलाइन शाळा सुरू ठेवण्यात आल्या होत्या. नवी मुंबई महापालिकेच्या शाळेत ३९ हजार विद्यार्थी शिक्षण घेत होते. मात्र गेल्या वर्षी ऑनलाइन वर्गात ५० टक्केपेक्षा कमी उपस्थिती होती. स्मार्ट मोबाइल नसणे, नेटपॅकसाठी पैसै नसणे आदी कारणे समोर आली होती. विद्यार्थीसंख्या अधिक असल्याने पालिका मोबाइल देऊ शकत नसल्याने प्रशासनाने ‘नेट पॅक’ ही योजना जाहीर केली. यात प्रतिविद्यार्थी सहा महिन्यांसाठी एक हजार रुपये देण्याचा निर्णय झाला आहे. पालिकेच्या शाळा सुरू होऊन आता दोन महिने झाले आहेत. मात्र अद्याप ही रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. याबाबत माहिती घेतली असता, शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या बँक खात्याविषयी माहिती घेतली असता महापालिका शाळेत प्राथमिक व माध्यमिक असे एकूण ३९ हजार विद्यार्थी आहेत. त्यापैकी केवळ २१ हजार विद्यार्थ्यांची म्हणजे ६३ टक्के विद्यार्थ्यांची बँक खाती

आहेत. तर उर्वरित ३७ टक्के विद्यार्थ्यांची बँक खाती उपलब्ध नाहीत. यामध्ये बालवाडी व पहिलीच्या सर्व विद्यार्थ्यांना नवीन बँक खाते तर इतर वर्गातील नवीन प्रेवश घेतलेल्या विद्यार्थ्यांना बँक खाते काढायचे आहे. मात्र कोणतीही बँक शून्य रकमेवर खाते उघडून देण्यास तयार नाही. त्यामुळे नेटपॅकची रक्कम अद्याप जमा करता आली नसल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

या वर्षातही उपस्थिती कमीच

महापालिकेच्या ऑनलाइन शाळा दोन महिन्यांपासून सुरू झाल्या आहेत. गेल्या वर्षी या ऑनलाइन तासाला ५० टक्केपेक्षा कमी उपस्थिती होती. आताही ४० ते ५० टक्के विद्यार्थी ऑनलाइन वर्गात येत नसल्याचे शिक्षकांनी सांगितले. महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांकडे स्मार्ट मोबाइल नाही. असला तरी तो त्यांच्या पालकांकडे असतो. त्यामुळे ते नोकरीसाठी गेल्यानंतर विद्यार्थ्यांना मोबाइल उपलब्ध होत नाही. तसेच एक मोबाइल आणि घरात दोन ते तीन विद्यार्थी असल्यानेही अडचणी येत आहेत.