उरण : जेएनपीए विद्यालय हे बंदराच्या अनुदानावर चालविले जात असून नव्याने आलेले आर.के.फाऊंडेशन संस्थेने यावर्षीच्या प्रवेशासाठी भरमसाट शुल्क वाढ केली आहे. या शुल्कवाढीला विद्यालयातील पालक संघटनेने विरोध दर्शविला आहे. या शुल्कवाढीसंदर्भात शुक्रवारी जेएनपीए प्रशासन भवनात झालेल्या जेएनपीए अधिकारी, पालक संघटना व शिक्षणसंस्था यांच्या प्रतिनिधीच्या झालेल्या बैठकीत पालकांनी कोणतेही वाढीव शुल्क न भरण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तसेच जेएनपीएने वाढीव शुल्काची जबाबदारी घेण्याची विनंती प्रशासनाला केली आहे.
जेएनपीएने आपल्या कामगारांच्या पाल्यांना शिक्षण मिळावे याकरिता कामगार वसाहती पहिली ते दहावीपर्यंतचे विद्यालय सुरू करण्यात आले आहे. हे विद्यालय चालविण्याचे काम पूर्वी इंडियन एज्युकेशन सोसायटीकडे होते ते सध्या आर.के. फाऊंडेशन या संस्थेला देण्यात आले आहे. या संस्थेने नव्या शुल्कवाढीचा निर्णय घेतला आहे.
या संदर्भात जेएनपीएचे सचिव व वरिष्ठ व्यवस्थापक जयवंत ढवळे यांच्या दालनात झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी माजी आमदार मनोहर भोईर, जेएनपीटी कामगार विश्वस्त भूषण पाटील, दिनेश पाटील, कामगार नेते रवींद्र पाटील, पालक संघटनेचे किरण घरत, शिक्षक नेते नरसू पाटील तसेच शाळा व्यवस्थापनाचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी जेएनपीए विद्यालयात येथील स्थानिक भूमिपुत्रांची मुले शिक्षण घेत असून त्यांच्यावर शुल्कवाढ अमान्य असून सामाजिक जबाबदारी म्हणून जेएनपीए प्रशासनाने शुल्काचा भार उचलावा. आम्ही वाढीव शुल्क भरणार नसल्याचे पालकांनी स्पष्ट केले.
राज्य सरकारच्या नियमांच्या अधीन राहून शुल्कवाढ केल्याचा तसेच यामुळे सध्याच्या शिक्षण घेत असलेल्या एकाही विद्यार्थ्यांना शुल्क भरावे लागणार नसल्याचा दावा आर.के. फाऊंडेशनच्या प्रतिनिधींनी केला. त्यानंतर नव्या संस्थेचे हस्तांतरण, अनियमित शिक्षकांना नियमित करण्याचे, शिक्षकेतर कर्मचारी यांचे वेतन आदी विषयांवरही या बैठकीत चर्चा करण्यात आली.