विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची राज्य सरकारवर टीका
नवी मुंबई : राज्यातील सरकारमध्ये समन्वयाचा अभाव असून शिक्षणसम्राटांचे सरकार असल्याने शुल्क माफी केली जाणार नाही, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.
गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्टद्वारा विविध लोकार्पण सोहळ्यानिमित्त फडणवीस हे नवी मुंबईत आले होते. यावेळी त्यांनी मराठा, ओबीसी आरक्षण, शिक्षण विभागातील कारभार, वारंवार होणारी पूरस्थिती, घटना दुरुस्ती अशा विविध विषयांवर भाष्य केले.
गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्टतर्फे ९ अत्याधुनिक रुग्णवाहिकांचे लोकार्पण, एमपीएसएसी परीक्षा पुस्तके वाटप, दिव्यांगांना रेशन वाटप आणि विरंगुळा केंद्रातील साहित्य वाटप फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. सीबीडी येथील नवी मुंबई महापालिका मुख्यालयात हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी आमदार गणेश नाईक, मंदा म्हात्रे, रमेश पाटील, माजी आमदार नरेंद्र पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, महापालिका आयुक्त अभिजीत बांगर आदी मान्यवर उपस्थित होते.
फडणवीस यांनी राज्य सरकारमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचा दावा करीत कधी शिक्षणमंत्री १७ तारखेपासून शाळा सुरू होणार असल्याचे जाहीर करतात, मात्र काही दिवसांत याला स्थगिती देतात अशी अनेक उदाहरणे असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात शिक्षण शुल्क माफी होऊ शकत नाही याला कारण म्हणजे हे शिक्षणसम्राटांचे सरकार आहे. आधी शुल्क वाढवतील आणि आंदोलन झाले की कमी करतील म्हणून मूळ शुल्क द्यावेच लागणार, असा आरोप फडणवीस यांनी केला.
आरक्षणाविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, १२७ वी घटना दुरुस्ती झाली त्यात एखाद्या समाजाला मागासवर्गीय ठरवण्याचा अधिकार राज्य सरकारला दिला आहे. मात्र मराठा आरक्षणाबाबतीत सरकार संकलित माहिती सादर करीत नाही. असेच ओबीसी आरक्षणाचे झाले असून २०२३ मध्ये राज्यातील दोनतृतीयांश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत तोपर्यंत राजकीय ओबीसी आरक्षण लटकावण्याचा सरकारचा डाव आहे.
कोल्हापूर सांगली भागात पूरपरिस्थिती नेहमीच होती म्हणून कृष्णा भीमा योजनेप्रमाणे हे पाणी दुष्काळी भागाकडे वळवणे आवश्यक आहे. तशी योजना युती काळात आखली गेली होती. या योजनेबाबत ठाकरे यांच्याशी बोलणे झाले. त्यांनी ही योजना राबवणार असल्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप कारवाई झाली नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले. विमानतळ नामकरणाबाबत छेडले असता, आमचे आमदार आंदोलनात सहभागी आहेत असे सांगत मूळ प्रश्नाचे थेट उत्तर देणे टाळले.
करोनाच्या आड निवडणुका लांबणीवर
नवी मुंबईत भाजपचीच सत्ता येणार असल्याने निवडणुका लांबणीवर टाकत असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर केला. जेथे आघाडीला चांगले वातावरण असते तेथे करोना आटोक्यात असा अहवाल आणि जेथे भाजपला चांगले वातावरण तेथे करोना गंभीर परिस्थिती असा अहवाल पाठवतात. असे करीत निवडणुका लांबणीवर पडतात अशी टीकाही त्यांनी केली.
