scorecardresearch

करोनामृत्यू दोन हजारांवर ; तिसऱ्या लाटेत मात्र दिलासा, लहान वयोगटातील मृत्यूंचे प्रमाण कमी

नवी मुंबईत करोनाचा पहिला रुग्ण १३ मार्च २०२० रोजी तर  पहिला करोना मृत्यू १५ मार्च २०२० रोजी झाला होता.

(संग्रहित छायाचित्र)

नवी मुंबई : शहरात करोनामुळे मृत्यूंची संख्या दोन हजार पार झाली आहे. आतापर्यंत २००४ मृत्यू झाले आहेत. यात पहिल्या लाटेत ११०१, दुसऱ्या लाटेत ८६८ तर तिसऱ्या लाटेत ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. या तिन्ही लाटेत सर्वाधिक मृत्यू हे ६१ ते ७० वयोगटातील  ५६८ इतके असून सर्वात कमी एक मृत्यू हा ० ते १० वयोगटातील आहे.

सध्या शहरातील तिसरी लाट ओसरली असून दैनंदिन करोना रुग्णांची संख्या  ६०० पर्यंत खाली आली आहे. २४ डिसेंबरपासून सुरू झालेली रुग्ण वाढ नियंत्रणात असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.

नवी मुंबईत करोनाचा पहिला रुग्ण १३ मार्च २०२० रोजी तर  पहिला करोना मृत्यू १५ मार्च २०२० रोजी झाला होता. त्यानंतर दोन वर्षे करोनाचे संकट शहरात आहे. २०२१ मध्ये १५ फेब्रुवारीनंतर शहरात पुन्हा करोनाचे रुग्ण वाढू लागल्याने शहराची चिंता अधिकच वाढली होती. त्यानंतर  मार्च, एप्रिल २०२१ पुन्हा एकदा करोनामुळे होणारे मृत्यू रोखण्याचे आव्हान पालिकेपुढे नव्याने उभे राहिले  होते. तर  २४ डिसेंबर २०२१ पासून शहरात तिसऱ्या लाटेचा प्रारंभ झाला व करोना काळातील सर्वोच्च रुग्णसंख्या, सर्वोच्च उपचाराधीन रुग्ण सापडले. परंतु दिलासादायक बाब म्हणजे दैनंदिन रुग्णांची संख्या मोठय़ा प्रमाणात सापडत असताना लक्षणे नसणे व सौम्य लक्षणे असलेले रुग्ण अधिक असल्याने  मृत्यू कमी झाले. एकंदरीतच शहरात करोनाच्या काळात  ० ते १० वयोगटातील फक्त एका मुलाचा करोनामुळे मृत्यू झाला तर  सर्वाधिक मृत्यू ज्येष्ठ नागिरकांचे झाले आहेत.

दरम्यान गुरुवारी एका मृत्यूची भर पडली असून दैनंदिन करोना रुग्णांची संख्या ५४२ पर्यंत खाली आली आहे.

शहरात करोनामृत्यूचे प्रमाण हे पहिल्या लाटेतच सर्वाधिक होते. तर तिसऱ्या लाटेत रुग्ण मोठय़ा संख्येने वाढत होते. परंतु मृत्यूचे प्रमाण कमी होते ही समाधानकारक बाब होती. आरोग्यसुविधांमुळे करोना मृत्यूचे प्रमाण इतर शहरांच्या तुलनेत कमी आहे. – संजय काकडे, अतिरिक्त आयुक्त

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Over 2000 dead from covid 19 in navi mumbai zws

ताज्या बातम्या