नवी मुंबई : नवी मुंबईतील १२.५ टक्के विकसित भूखंड योजनेला गेल्या वर्षभरात सिडकोने दिलेल्या गतीमुळे, तब्बल ३५ वर्षे रखडलेली नुकसानभरपाई प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. वर्षात एकदा सोडत यापेक्षा वेगळा पायंडा पाडत सिडकोने मागील वर्षांत चार स्वतंत्र सोडती जाहीर करून ४५० हून अधिक भूधारकांना भूखंडांचे वाटप पूर्ण केले. उर्वरित अडीच टक्के कामासाठीही जागा उपलब्धतेची प्रक्रिया सुरू असून, पुढील वर्षभरात सर्व शेतकऱ्यांना त्यांचे हक्काचे भूखंड देण्याचे नियोजन सिडकोने निश्चित केले आहे, अशी माहिती सिडको व्यवस्थापनाने दिली.

नवी मुंबई प्रकल्पासाठी ज्या शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या त्याच शेतकऱ्यांना मोबदल्यासोबत १२.५ टक्के विकसित भूखंड वाटप ही योजना तब्बल ३५ वर्षांपासून रखडली. शेतकऱ्यांची तिसरी पिढी सिडको कार्यालयात जाऊन आक्रोश करत आहे. यापूर्वी सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालक पदांवरील अधिकाऱ्यांनी या कामाला फारसे महत्त्व न दिल्याने सिडकोला आजही टोकाच्या टीकेचा सामना करावा लागत आहे. गेल्या दोन वर्षात सिडकोने या विभागाला दिलेल्या गतीमुळे ही योजना आता निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे.

शेतकऱ्यांची ही समस्या विधिमंडळात सदस्यांनी मांडल्यानंतर दोन वर्षांपूर्वी राज्याच्या मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर या प्रक्रियेला अजून गती मिळाली. व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल आणि सह व्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली १२.५ टक्के योजनेत तीन व २२ टक्के योजनेत एक अशा चार सोडती काढून अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रकरणांमध्ये लक्षणीय प्रगती साधण्यात आली.

मागील वर्षभरात ३१९, ९८ आणि ३६ अशा तीन सोडती अनुक्रमे उलवे, खारघर, करंजाडे व इतर नोडमध्ये काढण्यात आल्या. तसेच २२.५ टक्के योजनेअंतर्गत जुलैमध्ये काढलेल्या सोडतीत २९२ भूधारकांना २० हेक्टर क्षेत्राचे वाटप करण्यात आले.

गेल्या वर्षभरात या योजनेतील तीन वेगळ्या सोडती जाहीर करून ४५३ भूधारकांना ३४ हेक्टर क्षेत्र वाटप केले. त्यामुळे आतापर्यंत ९७.५ टक्के वाटप पूर्ण झाले. उर्वरित अडीच टक्यांमध्ये अवघे ३६७ भूधारक शिल्लक आहेत. पुढील वर्षभराच्या आत या भूधारकांना भूखंड मिळतील अशी कामाची आखणी केली आहे. – गणेश देशमुख, सह व्यवस्थापकीय संचालक, सिडको