नवी मुंबई : शिक्षण, आरोग्य आणि क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून नवी मुंबईला राष्ट्रीय स्तरावर वेगळी ओळख मिळवून देणारे पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने शहरात हळहळ व्यक्त होत आहे. नेरुळमध्ये उभारलेले शैक्षणिक संकुल, वैद्यकीय महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय, विद्यापीठ, बहुविशेषता रुग्णालय तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम यामुळे नवी मुंबईच्या जडणघडणीत त्यांचे योगदान महत्त्वाचे मानले जाते. त्यांच्या संस्थांमधून घडलेले हजारो विद्यार्थी आज देश-विदेशात विविध क्षेत्रांत कार्यरत असून, त्यांच्या निधनाने शिक्षणविश्वातील एक महत्त्वपूर्ण पर्व संपल्याची भावना व्यक्त होत आहे.

कोणतीही राजकीय किंवा सामाजिक पार्श्वभूमी नसताना शिक्षणाच्या बळावर संस्थांचे विशाल विश्व उभे करणाऱ्या डॉ. पाटील यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विविध उपक्रम राबविले. गुणवत्तापूर्ण शिक्षण, अत्याधुनिक आरोग्यसेवा आणि क्रीडा सुविधांचा संगम घडवून आणत त्यांनी नवी मुंबईला देशाच्या शैक्षणिक नकाशावर ठळक स्थान मिळवून दिले.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी केलेले कार्य आयुष्यभर विसरता येणार नसल्याची भावना नवी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. राहुल गेठे यांनी व्यक्त केली. “ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी खूप मोठे कार्य केले. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ‘कमवा व शिका’ योजनेप्रमाणे त्यांनी १ रुपयात शिक्षणाचा उपक्रम सुरू केला होता. त्याचा फायदा ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना झाला. त्यापैकी मी एक होतो. माझं मेडिकलच संपूर्ण शिक्षण १ रुपयात झालं. पुढे त्यांच्याच वैद्यकीय संस्थेत मी कामाला सुरुवात केली. त्यानंतर मी शासकीय सेवेत आलो. त्यामुळे माझ्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी केलेलं कार्य हे अतिशय महत्त्वाचं आणि मोलाचं आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

डॉ. पाटील यांच्या सहवासात काम केलेल्या सहकाऱ्यांच्या आठवणीतही त्यांचे व्यक्तिमत्त्व तितकेच जिवंत आहे. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. श्याम मोरे म्हणाले, “आमचे कुटुंब प्रमुख हरवले. ते आमच्यासाठी दैवत होते. त्यांनी आम्हाला कुटुंबासारखं सांभाळलं. केवळ शैक्षणिकच नव्हे तर कोणतीही राजकीय व सामाजिक पार्श्वभूमी नसताना त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं. त्यांच्यासोबत त्यांच्या संस्थेत काम करायला मिळालं हे माझं भाग्य आहे,” असे त्यांनी सांगितले.

संस्थेचे माजी संचालक व सल्लागार तसेच नवी मुंबई महापालिकेचे माजी उपायुक्त जगन्नाथ सिन्नरकर यांनीही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. “देव माणूस आमच्यातून गेला. एक मोठ्या मनाचा माणूस आम्ही गमावला. मी व माझ्या कुटुंबासाठी ते दैवत होते. अतिशय मायाळू आणि सर्वांना सहाय्यक करणारं व्यक्तिमत्त्व ते होते,” अशा शब्दांत त्यांनी श्रद्धांजली वाहिली.

डॉ. पाटील यांच्यासोबत तब्बल ३५ वर्षे काम केलेले डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे माजी रजिस्ट्रार सुनील गायकवाड यांनीही त्यांच्या सहवासातील आठवणींना उजाळा दिला. “आमच्यासाठी ते देव होते. त्यांच्यासोबत ३५ वर्षं काम करण्याची संधी मिळाली. एक साधा क्लार्क ते रजिस्ट्रार पदापर्यंत मी त्यांच्यासोबत काम केलं. माझ्या मुलांचे शिक्षण पाटील साहेबांमुळे होऊ शकले. त्यामुळे त्यांना कधीच विसरता येणार नाही. त्यांच्या जाण्याने केवळ शैक्षणिकच नव्हे तर राजकीय, सामाजिक क्षेत्राचेही मोठे नुकसान झाले आहे,” असे त्यांनी नमूद केले.

नवी मुंबईत उभारलेल्या शैक्षणिक संस्था, रुग्णालये आणि क्रीडा सुविधा ही डॉ. डी. वाय. पाटील यांच्या दूरदृष्टीची साक्ष देत राहतील. शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम मानून त्यांनी उभारलेला संस्थात्मक वारसा आजही हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देत आहे. त्यामुळे त्यांच्या निधनाने केवळ एका शिक्षणतज्ज्ञाचा नव्हे, तर नवी मुंबईच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलणाऱ्या द्रष्ट्या व्यक्तिमत्त्वाचा अंत झाल्याची भावना शहरभर व्यक्त होत आहे.