नवी मुंबई : नियोजनबद्धरित्या वसविलेल्या नवी मुंबई शहरात बेकायदा पार्किंगचा प्रश्न अतिशय बिकट बनला आहे. शहरातील वाहतुकीसाठी महत्त्वाच्या पाम बीच मार्गालगतच्या समांतर रस्त्यावर डंपरचे बेकायदा वाहनतळ निर्माण झाले आहे. यामुळे हा परिसर नागरिकांसाठी धोकादायक बनला आहे. नवी मुंबईचा क्विन नेकलेस समजल्या जाणाऱ्या पाम बीच मार्गावर अक्षर चौकालगतच्या पाम बीच समांतर रस्त्यावर डंपर उभे करण्यात येत आहेत. त्यामुळे हा मार्ग धोकादायक बनला असून त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
वाशी रेल्वे उड्डाणपूल सोडताच उपनगराला सुरुवात होते. येथून कोपरी उड्डाणपुलापर्यंत बेकायदा पार्किंग पाहायला मिळते. त्यातच सतरा प्लाझा परिसरात नियमबाह्य पद्धतीने उभ्या करण्यात येणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक व्यवस्थेचा खेळखंडोबा होत आहे. दरम्यान आता अक्षर चौकालगतच्या मार्गावर डंपर उभे करण्यात येत आहेत. त्यामुळे पादचारी व येथील स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. या मार्गावर दररोज अनेक नागरिक चालण्यासाठी येतात. परंतू या भागात विविध विकासकांच्या कामांमुळे पादचाऱ्यांना अडथळा निर्माण होतो.
त्यातच आता डंपरचालकांनी येथे बेकायदा वाहनतळ निर्माण केल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत. दरम्यान याबाबत सीवूड्स वाहतूक विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. शहरातील सर्वच मुख्य रस्त्यांवर सध्या दुतर्फा पार्किंग पाहायला मिळते. त्यामुळे शहरात ‘नो पार्किंग’चे फलक केवळ दाखविण्यासाठी आहेत का, असा प्रशान नागरिक विचारत आहेत. तसेच याबाबत कठोर पावले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
नागरिकांना चालण्यासाठी असणारा मार्ग हा बांधकाम व्यावसायिक तसेच डंपरचालकांनी ताब्यात घेतल्याचे चित्र आहे. पालिका आयुक्त व वाहतूक उपायुक्त यांनी एकदा या मार्गाची पाहणी करून योग्यती कार्यवाही करावी रमेश कापसे, पादचारी
दररोज सकाळ, संध्याकाळ या भागात चालायला येते. नातवंडे बरोबर असतात. येथे डंपर उभे केले जात असल्याने आम्ही चालायचे कसे, असा प्रश्न निर्माण होत आहे. तसेच अपघाताची भीती आहे. – हौसाबाई कांबळे, ज्येष्ठ नागरिक
नवी मुंबईमधील उपनगरांत वाहतुकीचा व पार्किंगचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून आता चक्क सीवूड्स विभागातील पामबीच समांतर मार्गावर बेकायदा पार्किंग केले जात आहे. त्यामुळे येथे मॉनिंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांचा जीव गेल्यास याला जबाबदार कोण, पालिका नगरचना विभाग व वाहतूक विभागाने याबाबत तात्काळ कारवाई करावी. – समीर बागवान, उपशहरप्रमुख, शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्ष
अक्षर चौकाजवळील पाम बीच लगतच्या समांतर रस्त्यावर डंपर बेकायदा उभे करण्यात येत असल्यास त्याबाबत पाहणी करून उपअभियंत्यांच्या मदतीने तात्काळ या वाहनांवर कारवाई करण्यात येईल. – प्रशांत नेरकर, सहाय्यक आयुक्त बेलापूर विभाग
