नवी मुंबई : पामबीच मार्गावर दुचाकीवरून धोकादायक स्टंटबाजी करणाऱ्या तरुणाविरोधात नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. मोराज सर्कल ते सारसोळे जंक्शनदरम्यान दुचाकीवरून स्टंट करणाऱ्या या तरुणाचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर पोलिसांनी त्याची दखल घेतली. शनिवारी रात्री पामबीच मार्गावर गस्तीदरम्यान संबंधित तरुण पोलिसांच्या निदर्शनास आला. पोलिसांना पाहून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या या तरुणाला सीवूड्स वाहतूक शाखेच्या पोलिसांनी पकडले. त्याच्याविरोधात वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी कारवाई करण्यात आली असून, कारवाईनंतर त्याने आपल्या कृत्याबद्दल माफी मागितली आहे.
पामबीच मार्गावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. या मार्गावर काही दुचाकीस्वारांकडून भरधाव वेगाने वाहन चालविणे आणि दुचाकीचे पुढील चाक उचलून स्टंटबाजी करण्याचे प्रकार घडत आहेत. अशा प्रकारांचे चित्रीकरण करून ते समाजमाध्यमांवर प्रसारित केले जात असल्याने इतर तरुणांकडूनही त्याचे अनुकरण होण्याची शक्यता आहे. मात्र, अशा स्टंटबाजीमुळे संबंधित दुचाकीस्वारासह रस्त्यावरील अन्य वाहनचालकांच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण होतो.
पामबीच मार्गावरील मोराज सर्कल ते सारसोळे जंक्शनदरम्यान एका तरुणाकडून अशाच प्रकारे स्टंटबाजी केली जात असल्याची बाब पोलिसांच्या निदर्शनास आली. विशेषतः नवी मुंबईतील आघाताचे केंद्रबिंदू असलेल्या पामबीच मार्गावर वर्दळीच्या वेळी दिवसाढवळ्या हे स्टंट केले जात असतानाचे व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्याने वाहतूक पोलिसांनी तरुणाचा शोध घेण्यास सुरुवात केली. शनिवारी रात्री गस्तीदरम्यान हा तरुण आढळल्यानंतर पोलिसांनी त्याला पकडले. वाहतूक पोलीस उपायुक्त राहुल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सीवूड्स वाहतूक शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुवर्णा राऊत यांनी ही कारवाई केली. संबंधित तरुणाला ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांच्या कारवाईनंतर संबंधित तरुणाने आपली चूक मान्य केली. पामबीच मार्गावर स्टंटबाजी करणे चुकीचे असून, त्यामुळे स्वतःच्या तसेच अन्य नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, अशी कबुली त्याने दिली. यापुढे असे कृत्य करणार नसल्याचे सांगत त्याने माफी मागितली. तसेच समाजमाध्यमांवरील स्टंटबाजीचे व्हिडिओ पाहून इतर तरुणांनी त्याचे अनुकरण करू नये, असे आवाहनही केले.
दरम्यान, पामबीच मार्गावर धोकादायक वाहनचालना करण्याबरोबरच दुचाकींमध्ये बदल करून मोठ्या आवाजाचे सायलेन्सर बसविणाऱ्यांविरोधातही वाहतूक पोलिसांकडून कारवाई सुरू आहे. मागील महिन्यात पोलिसांनी शंभरहून अधिक बदललेले सायलेन्सर जप्त केले होते. त्यानंतर विशेष कार्यक्रमात हे सायलेन्सर नष्ट करण्यात आले. स्टंटबाजी आणि कर्णकर्कश सायलेन्सरमुळे नागरिकांना होणारा त्रास रोखण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने कारवाई केली जात आहे. पामबीच मार्गावर अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी नियमित गस्त आणि कारवाई सुरूच राहणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
