पनवेल : करंजाडे वसाहतीमध्ये ११ जुलैला २८ वर्षीय तरुणाला युवकांच्या चौकडीने बेदम मारहाण केली होती. या मारहाणीनंतर मुंबई येथील जे. जे. रुग्णालयात उपचार सुरु असताना या तरुणाचा मृत्यू झाला. आसाराम वाकळे असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी मंगळवारी रात्री खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. हेही वाचा - दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर दर्यात जाण्यास नाखवा सज्ज हेही वाचा - बामणडोंगरीतील दुकानाना प्रतिचौरस मीटरला तीनपट चढ्या दराने भाव, मंगळवारी सिडको भवनात २४३ दुकानांच्या विक्रीची सोडत करंजाडे येथील महादेव मंदिराशेजारील चाळीत आसाराम कुटुंबियांसोबत राहत होता. ११ जुलैला रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास आसाराम जेवणासाठी जात असताना त्याच्याकडे पैशांची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्याने या युवकांच्या चौकडीने आसारामला बांबू व लोखंडी सळईने बेदम मारले होते. गंभीर जखमी अवस्थेमुळे आसारामवर मुंबई येथील जे. जे. रुग्णालयात उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाल्याने पनवेल शहर पोलिसांनी अनोळखी युवकांच्या चौकडी विरोधात भारतीय न्याय संहिता १०३ (१), ३०९ (६), ३११ अंतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.