पनवेल : कामावर जाणाऱ्या तसेच सकाळी फेरफटका मारणाऱ्या महिलांना लक्ष्य करून मंगळसूत्र आणि सोनसाखळी हिसकावण्याच्या घटनांनी पनवेल परिसरात पुन्हा डोके वर काढले आहे. २९ जुलै रोजी अवघ्या २० मिनिटांच्या अंतराने दोन घटना घडल्यानंतर ३ ऑगस्ट रोजीही पहाटे दोन महिलांच्या गळ्यातील दागिने दुचाकीस्वारांनी हिसकावले. चार घटनांमध्ये सुमारे अडीच लाख रुपयांचे सोने चोरीला गेले आहे. या घटनांमुळे पहाटे घराबाहेर पडणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, चोरट्यांवरील पोलिसांचा वचक कमी झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
२९ जुलै रोजी पहिली घटना नावडे कॉलनीतील सागर स्वीट फरसान दुकानासमोर सकाळी सव्वासहा वाजता घडली. अंचित अव्हॅन्यू इमारतीत राहणारी २९ वर्षीय महिला कामावर जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले. मंगळसूत्र तुटल्याने त्याचा काही भाग घेऊन चोरटे पसार झाले. मुंब्रा-पनवेल महामार्गालगत नावडे वसाहत आहे. या घटनेनंतर अवघ्या २० मिनिटांनी मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील बारवई गावाच्या पुलाजवळ दुसरी घटना घडली. दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पलायन केले.
तिसरी घटना ३ ऑगस्ट रोजी सकाळी पावणेसहा वाजता नवीन पनवेलमधील श्रेयस रुग्णालयासमोर घडली. पीडित महिला कामावर जाण्यासाठी पायी चालत असताना रेनकोट घातलेले दुचाकीस्वार त्यांच्या मागून आले. त्यांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि सोनसाखळी हिसकावून पलायन केले. त्यानंतर पाऊण तासाने, साडेसहा वाजता खारघर सेक्टर १२ मधील प्रणाम हॉटेलशेजारी चौथी घटना घडली. सकाळी फेरफटका मारणाऱ्या महिलेच्या पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील दोघांनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली.या चारही घटनांची नोंद अनुक्रमे तळोजा, पनवेल तालुका, खांदेश्वर आणि खारघर पोलीस ठाण्यांत करण्यात आली आहे.
नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे तंत्रस्नेही आणि कडक शिस्तीसाठी ओळखले जातात. त्यांच्या कार्यकाळात पोलीस दलात अनेक बदल करण्यात आले असून पोलीस यंत्रणा तंत्रस्नेही होत आहे. मात्र पायी जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी आणि मंगळसूत्र हिसकावण्याच्या घटना रोखण्यात पोलिसांना अपेक्षित यश मिळालेले दिसत नाही. त्यामुळे पनवेल परिसरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
पहाटेच्या वेळी पोलिसांची गस्त वाढविण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. रोडपाली येथील पोलीस मुख्यालयातील उपलब्ध मनुष्यबळाचा बंदोबस्ताबरोबरच पहाटेच्या गस्तीसाठी अर्धवेळ का होईना, वापर केल्यास दुचाकीवरून पसार होणाऱ्या चोरट्यांवर नियंत्रण ठेवणे शक्य होऊ शकते. पनवेलमधील अनेक रस्त्यांवर मोठ्या आस्थापना, महापालिका आणि सिडकोने सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. मात्र पोलिसांची गस्त आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे निरीक्षण यांच्या माध्यमातून या चोरट्यांना पकडण्याचे प्रयत्न अपुरे पडत असल्याचे या घटनांवरून दिसून येत आहे.
