पनवेल – न्हावा–शेवा उप प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत ३६ तासांचा शटडाऊन घेतल्यानंतर पनवेल परिसरातील सिडको वसाहतींमध्ये रविवारपासून दिवसभर गढूळ पाणीपुरवठा झाल्याने लाखो नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. पाण्यासोबत मातीचा थर आल्याने पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची अक्षरशः धावपळ झाली असून, सोसायट्यांच्या पाण्याच्या टाक्या पुन्हा स्वच्छ करण्याशिवाय दूसरा पर्याय उरला नाही. त्यामुळे जलवाहिनी दुरूस्तीच्या कामाकडे दुर्लक्ष झाल्याचा आर्थिक ताण सर्वसामान्य रहिवाशांवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. टाकी स्वच्छ करून द्या अन्यथा, टाकी स्वच्छ करण्याचा खर्च सिडको मंडळाने देण्याची मागणी नागरिक व राजकीय पक्षांकडून होत आहे.

न्हावा–शेवा पाणीपुरवठा योजनेअंतर्गत दुरुस्ती व नवीन जलवाहिनी कार्यान्वित करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने (एमजेपी) गुरुवारी (ता. १२) सकाळी ९ ते शुक्रवारी (ता. १३) रात्री ९ या कालावधीत ३६ तास पाणीपुरवठा बंद ठेवला होता. या शटडाऊनचा परिणाम कळंबोली, नवीन पनवेल, पनवेल शहर, खांदेश्वर, करंजाडे, नावडे तसेच करंजाडे, डेरीवली, वडघर, विचुंबे, उसर्ली, बेलवली-बारदोली आणि नांदगाव-कुडावे या सात गावांवर झाला. त्यामुळे नागरिकांना आधीच पाण्याचा साठा करून ठेवण्याचे आवाहन प्रशासनाने केले होते.

दरम्यान, तब्बल ४५ तासानंतर शनिवारी पहाटे सुमारे तीन वाजता पाणीपुरवठा पुन्हा सुरू झाला. मात्र रविवारी सकाळपर्यंत सिडको वसाहतींतील घरांमध्ये येणारे पाणी अत्यंत गढूळ असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. नळातून येणाऱ्या पाण्यात मातीचा थर मोठ्या प्रमाणात असल्याने पाणी उकळल्यानंतरही पिण्यायोग्य होत नसल्याची तक्रार रहिवाशांनी केली.

रविवारपासून सुरू झालेल्या या गढूळ पाण्यामुळे दोन दिवस गढूळ पाण्याने आंघोळ करण्याची शिक्षा सिडको वसाहतींमधील नागरिकांना मिळाली आहे. तसेच या गढूळ व दूषीत पाण्यामुळे सिडको वसाहतींतील गृहनिर्माण सोसायट्यांच्या पाण्याच्या टाक्यांमध्येही मोठ्या प्रमाणात माती साचली. परिणामी हजारो सोसायट्यांना नियोजित वेळेआधीच पाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्याची वेळ आली आहे. टाकी स्वच्छतेचा अतिरिक्त खर्च सोसायट्यांवर येणार असल्याने रहिवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

पिण्याच्या पाण्याअभावी नागरिकांनी रविवारी मोठ्या प्रमाणात सिलबंद पाण्याच्या बाटल्या खरेदी केल्या. त्यामुळे अनेक दुकानांमध्ये बाटलीबंद पाणीही उपलब्ध नसल्याचे चित्र दिसून आले.

विशेष म्हणजे एमजेपीने दिलेल्या शटडाऊनच्या सूचनेत गढूळ पाणीपुरवठ्याची शक्यता नमूद केली नव्हती. त्यामुळे सुमारे २० हजार जलजोडणीधारक ग्राहकांना अचानक या समस्येला सामोरे जावे लागले. गढूळ पाण्यामुळे सोसायट्यांना करावी लागणारी टाकी स्वच्छतेची अतिरिक्त खर्चाची भरपाई एमजेपी किंवा सिडकोने करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

“ जलवाहिनी दुरुस्तीच्या कामानंतर सिडको वसाहतींमध्ये गढूळ पाणीपुरवठा झाल्याने अनेक गृहनिर्माण सोसायट्यांच्या पाण्याच्या टाक्यांमध्ये माती साचली आहे. गढूळ पाण्यामुळे होणा-या साथरोगांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून सिडको प्रशासनाने तातडीने सर्व सोसायट्यांच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करून द्याव्यात. अन्यथा टाकी स्वच्छतेसाठी होणारा खर्च सोसायट्यांना भरपाई म्हणून द्यावा,” – बाळाराम पाटील, माजी आमदार, शेकाप