पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्र प्रदूषणाच्या विळख्यात अडकल्याचे पर्यावरणीय सद्यःस्थिती अहवालतून उघड झाले आहे. मंगळवारी पनवेल महापालिकेच्या महासभेत हा अहवाल मांडण्यात आला. यावेळी अहवालावर सभागृहातील सदस्यांना अभ्यास करण्यासाठी अजून वेळ सत्ताधारी बाकांवरील सदस्यांनी मागितल्याने हा विषय़ स्थगित करण्यात आला.

वेगाने होणारे नागरीकरण, वाढती वाहतूक, बांधकामाची धूळ, ध्वनी प्रदूषण आणि जलस्रोतांवरील वाढता ताण हे पनवेलच्या पर्यावरणासमोरील प्रमुख प्रश्न असल्याचे या अहवालातून स्पष्ट झाले आहे. मागील वर्षी जानेवारी ते मे या कालावधीत पनवेलचा सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) १०० होता. पीएम २.५ आणि पीएम १० या प्रदूषकांचे प्रमाण अनुक्रमे ४८ आणि ८२ मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटर नोंदले गेले असून, ते केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) अनुक्रमे ४० आणि ६० या वार्षिक मानकांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासोबत इतर वाहतूकीत सर्वाधिक वाहनसंख्येमुळे आणि बांधकाम क्षेत्रामुळे अधिक धूळ निर्माण करणाऱ्या पनवेलच्या सरकारी प्रशासनाला धूळ नियंत्रणाकडे अधिक लक्ष द्यावे लागणार आहे.

पर्यावरण विभागाचे उपायुक्त स्वरूप खारगे यांनी मांडलेल्या अहवालानुसार रस्ते वाहतूक हा वायूप्रदूषणाचा सर्वाधिक म्हणजे ४६ टक्के स्रोत आहे. बांधकामातून २० टक्के, रस्ते व मोकळ्या जागेतील धुळीतून १५ टक्के, औद्योगिक क्षेत्रातून १० टक्के आणि कचरा जाळण्यामुळे पाच टक्के प्रदूषण पनवेलमध्ये होत असल्याचे या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे बांधकामस्थळी धूळ नियंत्रण, नियमित यांत्रिक रस्ते सफाई, सार्वजनिक वाहतूक व स्वच्छ वाहतुकीला प्रोत्साहन, औद्योगिक उत्सर्जनावर नियंत्रण आणि रस्त्यालगत हरित पट्टा वाढविण्याची शिफारस करण्यात आली आहे.

ध्वनी प्रदूषणात पनवेल शहर केंद्राची दिवसा सरासरी ७४.५ डेसिबल, कळंबोलीजवळ मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ७८.३ आणि खांदेश्वर स्टेशन रस्त्यावर ६९.२ डेसिबल नोंद झाली. निवासी क्षेत्रासाठी दिवसाचे मानक ५५ डेसिबल असताना एकूण ४६ टक्के निरीक्षणस्थळांवर दिवसाचे आणि ३४ टक्के ठिकाणी रात्रीचे मानक ओलांडले गेले. वाहतूक हा ६७ टक्के, तर बांधकाम १८ टक्के ध्वनीचा स्रोत आहे.

जल प्रदूषणाचा प्रश्नही गंभीर आहे. त्याचाही उल्लेख या अहवालात करण्यात आला आहे. गणेशोत्सवासहीत इतर सणांच्या काळात पनवेल खाडी, खांदेश्वर तलाव आणि कळंबोली नाला, तसेच अन्य विसर्जनस्थळी पाण्याच्या गुणवत्तेत बदल झाला. पनवेल खाडीत विसर्जनादरम्यान विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण ५.६ वरून ३.२ मिलीग्रॅम प्रतिलिटर झाले, तर बीओडी ३ वरून ७.८ आणि विष्ठा कोलिफॉर्म २४० वरून ३२०० एमपीएन/१०० मिलीपर्यंत वाढला. त्यामुळे शाडू मातीच्या मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यासारखे उपाय या अहवालात मांडण्यात आले.

पनवेलमधील जमिनीच्या वापरातही बदल होत असल्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. २०२२ ते २०२५ या तीन वर्षांत बांधकाम क्षेत्र ४०.२ वरून ४२.६ टक्क्यांवर वाढले. मात्र, अहवालानुसार शेती/वनस्पती क्षेत्र १८.९ वरून १९.५ टक्क्यांवर गेल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच वनक्षेत्र १६.२ वरून १५.३ टक्क्यांवर आले आहे. २०२५ मध्ये विकासयोग्य जमीन ३१.८ चौ. किमी असून २०३० मध्ये अंदाजित मागणी ४१.२ चौ. किमी असल्याकडेही पनवेलकरांचे लक्ष वेधण्यात आले आहे.

सर्वात ज्वलंत प्रश्न सध्या पनवेलकरांना पिण्याच्या पाण्याचा भेडसावत असून पिण्याच्या पाण्याची पनवेलकरांची मागणी १९४ दश लक्ष लीटर (एमएलडी) असून पुरवठा १६२ एमएलडी होत असून ३२ एमएलडीची, अर्थात १६ टक्क्यांची तूट आहे. गळती कमी करणे, पावसाचे पाणी साठवणे, भूजल पुनर्भरण आणि प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा पुनर्वापर करण्याची शिफारस या अहवालात करण्यात आली आहे.

नागरिकांसह प्रशासनाला सूचना

पनवेलकरांनी कचरा जाळू नये, पाणी वाया घालवू नये, जलस्रोतांमध्ये निर्माल्य किंवा मूर्ती विसर्जित करू नये, अनावश्यक वाहनांचे हॉर्न व मोठ्या आवाजातील उपकरणांचा वापर टाळावा आणि बांधकामातून होणाऱ्या धुळीबाबत प्रशासनाकडे तक्रार करावी, अशा सूचना या अहवालात करण्यात आल्या आहेत. तसेच महापालिकेने हवा व ध्वनीचे नियमित निरीक्षण करावे, बांधकामस्थळी धूळ नियंत्रण बसवावे, जलस्रोतांचे प्रत्यक्ष वेळेआधारित परीक्षण करावे, गळती नियंत्रण, पावसाचे पाणी साठवण, हरित पट्टे निर्माण करणे, शांतता क्षेत्रांची अंमलबजावणी आणि तक्रार निवारण यंत्रणा अधिक प्रभावी करण्याची सूचना या अहवालात करण्यात आली आहे.

वायू प्रदूषणाचे स्रोत

रस्ते वाहतूक ४६ टक्के

बांधकाम २० टक्के

मोकळ्या जागेतील धूळ १५ टक्के

औद्योगिक क्षेत्र १० टक्के

कचरा जाळणे ५ टक्के