पनवेल : काँग्रेसने पनवेल शहर जिल्हाध्यक्षपदी प्रथमच एका महिलेची नियुक्ती करून ‘नारीशक्ती’चा संदेश देण्याचा प्रयत्न केला असला, तरी या निर्णयानंतर पक्षांतर्गत नाराजी आणि विरोधाची चर्चा सुरू झाली आहे. नव्याने नियुक्त झालेल्या श्रुती म्हात्रे यांनी कार्यकर्त्यांच्या बळावर संघटना मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला असताना, त्यांच्या निवडीच्या प्रक्रियेवर काही पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतल्याचे समोर आले आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी श्रुती म्हात्रे यांची पनवेल शहर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली. पनवेल महापालिका क्षेत्रात जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी महिलेकडे सोपविण्याची ही पहिलीच वेळ मानली जात आहे. नियुक्तीला पंधरा दिवसांहून अधिक कालावधी उलटला असला, तरी पक्षातील काही गटांकडून या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.

राहुल गांधी यांच्या ‘सुजन संघटना’ अभियानाअंतर्गत जिल्हाध्यक्ष निवडीसाठी कार्यकर्त्यांचे मत जाणून घेण्याची प्रक्रिया राबविण्यात आली होती. या प्रक्रियेत माजी जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, हेमराज म्हात्रे आणि नगरसेवक हरेश केणी यांची नावे चर्चेत होती. मात्र अंतिम टप्प्यात पक्षश्रेष्ठींनी श्रुती म्हात्रे यांच्या नावाची घोषणा केली. त्यामुळे इच्छुक गटांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याची चर्चा पक्षवर्तुळात सुरू आहे.

श्रुती म्हात्रे या व्यवसायाने वास्तुविशारद असून त्यांनी वकिलीचे शिक्षण घेतले आहे. त्यांचे वडील दिवंगत कामगार नेते शाम म्हात्रे यांच्या सामाजिक कार्याचा वारसा त्यांना लाभला आहे. पनवेल काँग्रेसमधील काही नाराज पदाधिकाऱ्यांनी पक्षश्रेष्ठींकडे तोंडी आणि लेखी तक्रारी केल्याची माहिती समोर आली आहे.

पनवेलमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससमोर संघटनात्मक एकजूट राखणे, नाराज गटांना सोबत घेणे आणि नव्या नेतृत्वाभोवती कार्यकर्त्यांना एकत्र करणे हे मोठे आव्हान मानले जात आहे.

आंतरराष्ट्रीय विमानतळ तसेच विविध राष्ट्रीय प्रकल्पांमुळे पनवेलचे महत्व वाढले आहे. शासनाने सुद्धा नारीशक्तीचा नारा देत पनवेलच्या तहसिलदार पदी मीनल भामरे तसेच पोलीस उपायुक्त पदी ऱश्मी नांदेडकर यांची नियुक्ती केली आहे. शिवसेना (ठाकरे गट) जिल्हाध्यक्ष पद हे नगरसेविका लीना गरड यांना हे पद दिले जाईल असे वाटत असताना दीपक निकम यांना पक्षाने संधी दिली. मात्र पनवेलच्या राजकारणात पहिल्यांदा महिलेला संधी देण्याचा मान कॉंग्रेसने पटकावला. त्यामुळे म्हात्रे यांच्या निवडीनंतर इतर राजकीय पक्ष यातून काय बोध घेतील याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.

आपली नियुक्ती कोणत्याही शिफारशीमुळे किंवा वशिल्यामुळे झालेली नसून पक्षातील कामाचा अनुभव, कार्यकर्त्यांचा पाठिंबा आणि निवड प्रक्रियेतील पारदर्शकतेच्या आधारे झाली आहे. मी सुद्धा जिल्हाध्यक्ष पदासाठी अर्ज केला होता. त्यापेक्षा कार्यकर्त्यांनीच माझ्या नावाची मागणी निवड समितीसमोर केली असेल. त्यामुळे तळागाळातील नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी अहोरात्र काम करणार. – श्रुती म्हात्रे, जिल्हाध्यक्षा, पनवेल शहर.

कोणतेही पद कायमस्वरूपी नसते, आपण पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते असून नव्या नेतृत्वासोबत काम करण्यास कटिबद्ध आहोत. राहुल गांधी यांच्या संकल्पनेवरून सुजन संघटनेच्या निवड समितीसमोर तीनच नावे असताना चौथ्या नावाची अनपेक्षित निवड झाल्याने ही प्रक्रिया चुकीचे राबविल्याचे मत काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केले असेल. परंतू अखेर पक्षश्रेष्ठींनी निर्णय जाहीर केल्यामुळे पक्षात सक्रिय राहुन काम करणार आहोत – सुदाम पाटील, माजी जिल्हाध्यक्ष, पनवेल शहर.