पनवेल : पनवेल महानगरपालिका हद्दीलगत वाढत जाणारी लोकसंख्या लक्षात घेता एनएमटी आणि बेस्ट या दोन उपक्रमांमार्फत सुरू असलेली बससेवा अपुरी असल्याचा ठोस निष्कर्ष महापालिकेने नेमलेल्या विशेष अभ्यास समितीने काढला आहे. संपूर्ण पट्ट्यात स्वतंत्र परिवहन उपक्रम सुरू करण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली असून त्या अनुशंगाने महापालिकेच्या स्वतंत्र बससेवेच्या मंजूर झालेल्या प्रस्तावाला महत्त्व मिळाले आहे.
महापालिकेच्या गुरुवारी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत सदस्यांनी एकमताने महापालिकेची स्वतंत्र बससेवेचा ठराव मंजूर केला. प्रस्तावानुसार १०० बस खरेदी करणे, ६८ बसथांबे उभारणे, बस आगार आणि चार्जिंग केंद्रांची व्यवस्था करणे यांचा समावेश आहे. मात्र, बससेवेच्या अंमलबजावणीपूर्वी बसचा प्रकार, आकार आणि इंधनाचा पर्यायासोबत डबरडेकर बसची उपसूचना सदस्यांनी मांडल्या.

महापौर नितिन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत बससेवा या महत्त्वाच्या मुद्द्यावर महापालिकेने तयार केलेल्या प्रस्तावाचे उपायुक्त अभिषेक पराडकर आणि परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे यांनी सादरीकरण केले. सभेत प्रस्तावाला मंजुरी देताना सदस्यांनी काही बदल सुचवले. सर्व १०० बस विजेवर चालणाऱ्या घेण्याऐवजी त्यापैकी निम्म्या बस गॅसवर चालणाऱ्या असाव्यात, अशी उपसूचना काँग्रेसचे सदस्य लतिफ शेख यांनी मांडली. इतर महापालिकांच्या परिवहन विभागाला आलेला अनुभव सुद्धा तपासून पहावा असेही ते म्हणाले. पनवेल शहरातील अरुंद रस्त्यांचा विचार करून कमी लांबीच्या बस खरेदी कराव्यात, अशीही मागणी त्यांनी केली. ज्या मार्गांवर प्रवाशांची संख्या अधिक आहे, तेथे कामावर ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी डबलडेकर बसचा पर्यायही तपासावा, असे शिवसेना (शिंदे गट) सदस्य सायली सरक यांनी सुचवले. तसेच डबलडेकर बसमधून कर्नाळा व इतर पर्यटनस्थळांपर्यंत सुरू करण्याचा विचार करावा असेही मत मांडले.

प्रस्ताव असा…

अपेक्षित खर्च २८७.५५ कोटी रुपये

१०० बस खरेदीसाठी १५० कोटी रुपये

६८ बसथांब्यांसाठी ८.१५ कोटी रुपये

बस डेपोसाठी ३० कोटी रुपये

७६ चार्जिंग केंद्रांसाठी ८.४ कोटी रुपये

इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टिमसाठी ८६ कोटी

अहवालात दुरुस्ती

महापालिका क्षेत्रातील सहा ते आठ टक्के भाग ग्रामीण असून, या भागात १२ ते १५ टक्के नागरिक राहतात. संपूर्ण महापालिका क्षेत्रातील नागरिकांना सेवेचा लाभ मिळावा, यासाठी आणखी लहान बस घेण्याबाबत सल्लागाराला सांगून अहवालात आवश्यक दुरुस्ती करून घेतली जाईल, अशी माहिती पालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी दिली आहे.

पाच ठिकाणी बस आगार

नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन उपक्रमाकडून वार्षिक प्रतिपूर्ती रकमेची मागणी केली जात आहे. विजेवर धावणाऱ्या बसच्या बॅटरीची क्षमता दरवर्षी २० टक्क्यांनी कमी होते. सहा वर्षांनंतर बॅटरी बदलावी लागते; मात्र तिचा विमा उतरवलेला असतो. प्रत्यक्षात जितक्या बस धावतील, त्यानुसारच महापालिका पैसे अदा करणार आहे. या सर्व बसवरील वाहक महापालिकेचे असतील. महापालिका क्षेत्रातील आरक्षित जागांवर पाच ठिकाणी बस आगार उभारण्याचे नियोजन आहे.

केंद्र सरकारने पर्यावरणपूरक बससेवेसाठी निधी देण्याची योजना जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत देशभरातील ४,७०० बसची निविदा प्रक्रिया झाली आहे. सिडकोबरोबर वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्प उभारला जात असून, त्यातून महापालिकेला वापरासाठी प्रतियुनिट पाच रुपये दराने वीज मिळणार आहे. बसच्या चार्जिंगसाठी या विजेचा वापर केल्यास महापालिकेची तिप्पट रक्कम वाचू शकेल. प्रशासनाने अत्यंत व्यवहार्य प्रस्ताव मांडला आहे. मुंबई महानगर प्रदेशातील शहरांची वाढही या अहवालात विचारात घेतली आहे. – मंगेश चितळे, आयुक्त, पनवेल महापालिका

पनवेलकरांच्या हिताच्या दृष्टीने बससेवा जितक्या लवकर सुरू होईल, तितके चांगले. केंद्र सरकारच्या अनुदानाचा लाभ घेऊन ही सेवा सुरू होत आहे. बसमधील वाहकांची नियुक्ती महापालिका करणार आहे. प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष बस रस्त्यावर धावेपर्यंतच्या प्रक्रियेचा पाठपुरावा करण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करावी. – ॲड. प्रथमेश सोमण, सदस्य, शिवसेना

महापालिकेची स्वतःची परिवहन सेवा सुरू करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली, तरी प्रत्यक्ष सेवा सुरू होण्यासाठी आणखी दोन ते तीन वर्षे लागू शकतात. त्यामुळे तोपर्यंत पनवेलमधील प्रवाशांचा विचार करून अर्थसंकल्पात तरतूद करावी आणि प्राथमिक टप्प्यात भाडेतत्त्वावर २० बस सुरू करून करदात्यांना दिलासा द्यावा. यासाठी भाडेतत्त्वावर बस चालविणाऱ्या कंपन्यांची नियुक्ती करण्याचा विचार महापालिकेने करावा. – अरविंद म्हात्रे, विरोधी पक्षनेते, पनवेल महापालिका

पनवेलच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या परिवहन सेवा सुरू करण्याच्या प्रस्तावाला मी समर्थन देत आहे. केंद्र सरकारकडून प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर कोणत्या प्रकारच्या बस घ्याव्यात, बसथांबे आणि आगार कुठे असावेत, याचे नियोजन करण्यासाठी वेळ मिळणार आहे. महापालिकेत परिवहन समिती नसल्याने या विषयाचा पाठपुरावा करण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करावी. तसेच मुख्य प्रस्तावाला मंजुरी देतानाच सदस्यांनी मांडलेल्या उपसूचनांचाही विचार करावा. – ॲड. प्रकाश बिनेदार, सभागृह नेते, पनवेल महापालिका