पनवेल – मागील दोन दिवसांत पनवेल, करंजाडे आणि कामोठेत तीन महिलांच्या मंगळसूत्र चोरीच्या घटनांमुळे नवी मुंबईचे पोलीस गेले कुठे असा संताप महिलावर्गातून व्यक्त केला जात आहे. या तीन घटनांमध्ये महिलांच्या गळ्यातून तब्बल ११ लाखांचे मंगळसूत्र लुटीच्या धक्कादायक घटनांनी पनवेलमधील महिला वर्ग हादरून गेला आहे. अवघ्या दोन दिवसांत दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलांना थेट लक्ष्य करत तब्बल ११ लाख २० हजार रुपयांची सोन्याची मंगळसूत्रे हिसकावून पळ काढला. पोलिसांचा वचक संपल्याने चोरट्यांचे मनोधैर्य वाढले असून महिलांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. विशेष म्हणजे महिला या चो-यांमध्ये गंभीर जखमी होत आहेत.
मंगळवारी पहाटे करंजाडे वसाहतीत पहिली घटना घडली. सेक्टर ३ मधील विनायक अक्षय सोसायटीत राहणाऱ्या ५५ वर्षीय महिला पतीसोबत मॉर्निंग वॉक करत असताना दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांना जोरात धक्का दिला. गळ्यातील २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून ते पसार झाले. या झटापटीत महिलेच्या गळ्याला गंभीर दुखापत झाली.
पहाटेच्या वेळेसही महिलांना सुरक्षितता नाही, हे या घटनेने स्पष्ट केले.दुसरी घटना बुधवारी सायंकाळी पनवेल शहरात घडली. मुलीचे लग्न आटपून स्वामी नित्यानंद मार्गावरील मेडिसिटी मेडिकल समोर थांबलेल्या महिलेवर दुचाकीवरील दुकलीने थेट हल्ला केला. जोरदार फटका मारून सात तोळे वजनाचे, सुमारे सात लाख रुपयांचे मंगळसूत्र हिसकावून चोरटे फरार झाले. भर वर्दळीच्या ठिकाणी अशी घटना घडणे हे पोलिसांच्या अपयशाचे जिवंत उदाहरण आहे.
तिसरी आणि सर्वाधिक संतापजनक घटना बुधवारी रात्री आठ वाजता कळंबोली सर्कल ते कामोठे महामार्गावर घडली. धावत्या रिक्षात प्रवास करणाऱ्या ५५ वर्षीय महिलेच्या गळ्यावर चोरट्याने हल्ला करत ३० ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र हिसकावले. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली.
नवी मुंबई पोलिसांकडून रस्त्यावरील गुन्हेगारीकडे होत असलेले दुर्लक्ष स्पष्ट दिसत आहे. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या तीन वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी बेशिस्त पोलिसांना प्रामाणिकपणाचे धडे, शिस्त लावण्यात, पारदर्शक कारभार करण्यात आणि अमली पदार्थ मुक्त नवी मुंबई तसेच इंटरनेटचा प्रभावी वापर करणारे पोलीस घडविण्यात गेले.
मात्र मागील दोन दिवसात पनवेलच्या रस्त्यावर महिलांच्या सूरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. सहा मिनिटांत पोलिस घटनास्थळी पोहचतील असा दावा करणा-या नवी मुंबई पोलिसांना गुन्हेगार पकडण्यासाठी महिने आणि वर्षानुवर्षे का लागतात असा साधा प्रश्न महिलावर्गांकडून विचारला जात आहे. पोलीस गस्त नसणे, नाकाबंदीत सातत्य नसणे आणि सीसीटीव्ही कॅमेरांपुरताच नवी मुंबई पोलिसींग शिल्लक राहील्याची चर्चा नागरिक करू लागले आहेत. पोलिसांनी तातडीने कडक कारवाई केली नाही, तर चोरट्यांचा हा धुमाकूळ आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

