पनवेल : शहरात शनिवारी दहीहंडी उत्सव सुरू असताना लाईनआळी येथील शिवसेना शाखेजवळ सहा जणांना विजेचा झटका लागल्याची घटना घडली. या घटनेनंतर परिसरात उपस्थित तरुणांची धावपळ उडाली. जखमींना मिळेल त्या वाहनांतून विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले. या घटनेची अधिकृत नोंद पनवेल महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे नसल्याने नेमके किती जणांना विजेचा झटका लागला, याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, पनवेल शहर पोलिसांनी घटनेची नोंद केली असून रविवारी संबंधित दहीहंडी आयोजकांविरोधात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. शनिवारी आपत्तीच्या वेळी करण्यात आलेल्या मदतकार्याची ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर सरकारी प्रशासनाला जाग आली.
पनवेल शहरात सुमारे २०० हून अधिक वर्षांची नवनाथांच्या हंडीची परंपरा आहे. याच हंडीचा कार्यक्रम सुरू असताना ही घटना घडली. दहीहंडीत सहभागी झालेल्या तरुणांवर पाणी मारले जात असताना विजेच्या तारांमधून प्रवाहित होणाऱ्या विजेमुळे त्यांना झटका लागल्याचे सांगितले जाते. घटनेनंतर काही मिनिटांतच परिसरातील वीजपुरवठा बंद करण्यात आला. त्यामुळे मदतकार्य तातडीने सुरू करता आले. या दहीहंडीत सहभागी झालेले सहा जण जखमी होऊन जमिनीवर पडले. त्यानंतर काही तरुणांनी आपल्या दुचाकी आणि इतर वाहनांतून जखमींना जवळच्या उपजिल्हा रुग्णालयात नेले. या मदतकार्यात पनवेलकरांनी आपत्तीच्या वेळी एकमेकांना मदत करण्याचा नमुना दाखवून दिला.
यापूर्वीही पनवेलमधील विविध राजकीय पक्षांच्या नगरसेवकांनी ब्रिटिशकालीन विजेच्या तारांमुळे शहरात अशा प्रकारचे धोके निर्माण होण्याची भीती व्यक्त केली होती. मात्र, सरकारी काम आणि वर्षानुवर्षे थांब या गतीने पनवेलचे प्रशासन आणि राज्यकर्ते काम करत असल्याने शहरातील भूमिगत वीजवाहिन्या टाकण्याचा प्रश्न आजही जैसे थे आहे. पाच हजार कोटी रुपयांची वार्षिक आर्थिक उलाढाल असलेल्या महापालिकेच्या प्रशासनाने वीजवाहिन्या भूमिगत करण्याच्या कामाला तितकेसे महत्त्व आणि प्राधान्य दिलेले नाही. ही कामे वेळीच झाली असती तर शनिवारी घडलेली घटना टाळता आली असती, अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे.
हा अपघात नेमका कशामुळे झाला, याचा शोध पोलीस आणि वीज विभागाचे अधिकारी घेत आहेत. पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना संबंधित दहीहंडीचे आयोजन करणाऱ्यांविरोधात रविवारी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले. एकूण सहा जणांना विजेचा धक्का लागला होता. त्यापैकी दोन तरुण जागेवरच बरे झाले, तर इतर जखमींना पनवेल शहरातील उपजिल्हा रुग्णालय तसेच नजीकच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले
