पनवेल : पावसाळ्यात अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेता पनवेल महापालिका हद्दीतील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी तातडीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी गुरुवारी केले. सन २०२६-२७ साठी करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार महापालिका क्षेत्रातील विविध प्रभागांमध्ये एकूण ६४ सी-१ प्रवर्गातील (अतिधोकादायक) इमारती घोषित करण्यात आल्या असून, या इमारतींमध्ये राहणाऱ्यांनी कोणताही धोका पत्करू नये, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रातील कामोठे उपनगरात १५ वर्षांपूर्वी बांधलेल्या इमारतीच्या छताचा भाग अंगावर कोसळून ४५ वर्षीय सूरेश लोखंडे यांचे प्राण गेले. ही घटना खासगी इमारतीत घडल्याने पनवेलमध्ये भितीचे वातावरण आहे. विकसकांनी बांधलेल्या निकृष्ट दर्जाच्या इमारतींच्या खाली सामान्यांचे जिव जात असल्याने पनवेलमध्ये जिर्ण इमारतींमध्ये राहणा-यांचे धाबे दणाणले आहेत. सध्या पनवेल महापालिकेने अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर केली त्यामध्ये प्रभाग समिती ‘अ’ मध्ये ४, प्रभाग समिती ‘ब’ मध्ये २०, प्रभाग समिती ‘क’ मध्ये ८, प्रभाग समिती ‘ड’ मध्ये ३२ अशा ६४ मालमत्ता अतिधोकादायक श्रेणीत असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. पावसाळ्यात धोकादायक इमारतींमध्ये राहून कोणतीही दुर्घटना, जीवितहानी किंवा वित्तहानी होऊ नये यासाठी महापालिका प्रशासन कटिबद्ध असल्याचे आयुक्त चितळे यांनी सांगितले. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम २६४ ते २६८ तसेच राज्य शासनाच्या निर्देशांनुसार संबंधित इमारतींचे सर्वेक्षण करून धोकादायक इमारतींची यादी निश्चित करण्यात आली आहे.
या इमारतींमधील रहिवाशांना वेळोवेळी नोटिसा देऊन सदनिका रिक्त करण्याच्या सूचना देण्यात आल्याचा दावा महापालिकेने आहे. मुंबई उच्च न्यायालय तसेच राज्य शासनाच्या आदेशानुसार संबंधित मालक, भोगवटादार आणि रहिवाशांना इमारती रिकाम्या करण्याची संधीही देण्यात आली होती. मात्र, काही ठिकाणी अद्यापही नागरिक वास्तव्यास असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.
अशा इमारतींमधील दुर्घटना टळण्यासाठी वीज व पाणीपुरवठा खंडित करून आवश्यक असल्यास पोलिस बंदोबस्तात इमारती रिकाम्या करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. अतिवृष्टीमुळे धोकादायक इमारती कोसळण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने नागरिकांनी स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी तातडीने स्थलांतर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
धोकादायक इमारतीत वास्तव्यास राहून कोणतीही दुर्घटना घडल्यास त्यातून होणाऱ्या जीवित किंवा वित्तहानीस संबंधित रहिवासी, मालक आणि भाडेकरू स्वतः जबाबदार राहतील, असा इशाराही महापालिकेने दिला आहे. संबंधित इमारतींचे संरचनात्मक लेखापरीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) करून घेण्याची जबाबदारी मालक व भोगवटादारांचीच राहणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकात महापालिकेने नमूद केले आहे. धोकादायक व अतिधोकादायक इमारतींची संपूर्ण यादी महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. नागरिकांनी आपल्या परिसरातील इमारतींबाबत जागरूक राहून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी महापालिकेच्या दूरध्वनी क्रमांक ०२२-२७४६१५०० किंवा टोल फ्री क्रमांक १८००२२७७०१ वर संपर्क साधावा, अशी माहिती उपायुक्त रविकिरण घोडके यांनी दिली.
