पनवेल – धोदाणी येथील वाघाची वाडी परिसरातील नदीतील पाण्यात खेळण्यासाठी आलेले दोन मित्र बुडाल्याच्या घटनेने पनवेलमध्ये एकच खळबळ उडाली आहे. बुडणाऱ्या मित्राला वाचविण्यासाठी पाण्यात उतरलेल्या दुसरा मुलगाही बुडाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्घटनेत रविवारी वाहून गेलेल्या दुसऱ्या तरुणाचा २४ तास उलटूनही सोमवारी सायंकाळपर्यंत शोध लागला नाही. मुसळधार पाऊस आणि नदीतील वेगवान प्रवाहामुळे शोधकार्यात अडथळे येत असून पोलीस आणि पनवेल महापालिकेचे अग्निशमन दल बेपत्ता तरुणाचा शोध घेत आहे.
मुसळधार पावसामुळे माथेरानच्या डोंगररांगांमधून ग्रामीण पनवेलच्या ओढे व नद्यांमध्ये पाण्याचे प्रवाह ओसंडून वाहत आहेत. रविवारी विचुंबे गावातील १० तरूण मित्र वर्षा सहलीच्या निमित्ताने ग्रामीण पनवेलमधील धोदाणी गावाजवळील वाघाची वाडी येथे आले होते. नदी दुथडी भरून वाहत असताना काही तरुण पाण्यात उतरले. त्यापैकी एक जण प्रवाहात अडकताच त्याला वाचविण्यासाठी अनेक मित्रांनी प्रयत्न केले. यामध्ये नयन म्हात्रे आणि सुमित पवार हे पाण्यात बुडाले. नदीतील प्रचंड प्रवाह आणि भोवऱ्यात दोघेही वाहून गेले.
घटनेनंतर उपस्थित मित्रांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. अथक प्रयत्नांनंतर सुमित पवार याला नदीतून बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. नयन म्हात्रे हा मात्र प्रवाहात वाहून गेल्यापासून बेपत्ता आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस, महसूल विभाग आणि पनवेल महापालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. रविवारी सायंकाळपर्यंत शोध लागला नसल्याने सोमवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली. अग्निशमन दलाच्या सुमारे २० जवानांनी बोटीच्या साहाय्याने दीड किलोमीटर नदीपात्रात शोध घेतला. मात्र वाढलेली पाणीपातळी, वेगवान प्रवाह आणि सतत सुरू असलेल्या पावसामुळे शोधकार्यात अडचणी येत असल्याची माहिती पनवेलचे नायब तहसीलदार संभाजी शेलार यांनी दिली.
सायंकाळपर्यंत नयनचा शोध लागला नसल्याने शोधमोहीम थांबविण्यात आली असून परिस्थिती अनुकूल झाल्यानंतर ती पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. या दुर्घटनेमुळे विचुंबे गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
