पनवेल : गणेशोत्सव आणि दसऱ्याच्या काळात पनवेल शहरातील बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी नियंत्रित करण्यासाठी नियोजन करण्यात आले होते. मात्र, वाहनतळाची पुरेशी आणि व्यवस्थित व्यवस्था न झाल्याने अनेक नागरिकांना आपल्या मोटारी रस्त्याच्या कडेला उभ्या कराव्या लागल्या होत्या. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला होता. दिवाळीच्या खरेदीसाठीही शहरात मोठ्या संख्येने नागरिक येण्याची शक्यता लक्षात घेऊन यंदा पनवेल महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्तपणे वाहनतळांचे नियोजन केले आहे. शहरातील पाच ठिकाणी सुमारे ५०० मोटारी उभ्या करण्याची व्यवस्था करण्यात येणार असून, यासंदर्भातील अधिसूचना वाहतूक पोलीस विभागाकडून लवकरच प्रसिद्ध केली जाणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले.

दिवाळीच्या खरेदीसाठी पनवेल तालुक्यातील विविध गावांमधून नागरिक शहरात येतात. त्यामुळे बाजारपेठांमधील गर्दीबरोबरच वाहनांची संख्या वाढून वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असते. ही समस्या टाळण्यासाठी १ नोव्हेंबरपासून वाहनतळांची व्यवस्था करण्याच्या दृष्टीने शुक्रवारी पनवेल महापालिकेत आयुक्त मंगेश चितळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीला पनवेल शहर वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी, महापालिकेचे परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे आणि प्रभाग अधीक्षक राजेश डोंगरे उपस्थित होते.

बैठकीत शहरातील पाच ठिकाणी सुमारे ५०० मोटारी उभ्या करण्याचे नियोजन करण्यात आले. यामध्ये बापट वाडा येथील काम सुरू असलेल्या जागेचा समावेश आहे. जागामालकांना आयुक्तांनी विनंती केल्यानंतर त्यांनी काही दिवसांसाठी ही जागा उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली आहे. या ठिकाणी सुमारे ६० मोटारी उभ्या करता येतील. त्यामुळे नागरिकांना कापड गल्लीसह परिसरातील व्यापारी पेठांमध्ये खरेदीसाठी जाणे सोयीचे होणार आहे.

पनवेलच्या अपर तहसीलदार कार्यालयाजवळील कर्मवीर भाऊराव चौक ते कर्नाळा भाजी मार्केट या रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी करण्याचेही नियोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी ५० हून अधिक मोटारी उभ्या करता येतील. मात्र, या व्यवस्थेमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी वाहतूक पोलीस विभागाकडून नियोजन केले जाणार आहे.

शहरातील नाट्यगृह आणि त्याशेजारील वाहनतळावर सुमारे १२० मोटारी उभ्या करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाशेजारील मोकळ्या जागेत अडीचशेहून अधिक मोटारी उभ्या करण्याचे नियोजन आहे. ही जागा लवकरात लवकर स्वच्छ करून वाहनतळासाठी वापरण्यायोग्य करण्याची जबाबदारी आयुक्त चितळे यांनी प्रभाग अधीक्षक राजेश डोंगरे यांच्याकडे सोपवली आहे.

वाहतूक नियमनासाठी सुरक्षा जवानांची मदत

पनवेल शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नवी मुंबई पोलिसांकडून महापालिकेकडे वाहतूक नियमनासाठी अतिरिक्त मनुष्यबळाची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार महापालिकेने संपूर्ण महापालिका क्षेत्रात पोलिसांच्या मदतीसाठी महाराष्ट्र सुरक्षा दलाचे ६० जवान उपलब्ध करून दिले आहेत. सध्या हे जवान शहरातील विविध वाहतूक सिग्नलवर नियमनाचे काम करत आहेत. दिवाळीच्या काळात वाहनांची संख्या आणि बाजारपेठांमधील गर्दी वाढण्याची शक्यता असल्याने वाहतूक पोलीस विभागाकडून आणखी जवानांची मागणी करण्यात येत आहे.   

वाहनतळांचा वापर करण्याचे आवाहन

“दिवाळीच्या खरेदीसाठी शहरात येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसह मोटारमालक आणि व्यापाऱ्यांना गर्दीचा सामना करावा लागू नये, यासाठी महापालिका आयुक्तांकडे वाहनतळांच्या नियोजनाची विनंती करण्यात आली होती. त्यानंतर आयुक्तांनी तातडीने आढावा बैठक घेतली. संबंधित वाहनतळांची ठिकाणे निश्चित करण्याबरोबरच कर्मवीर भाऊराव चौक ते कर्नाळा भाजी मार्केट या रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी करण्याबाबत वाहतूक पोलीस विभागाकडून अधिसूचना प्रसिद्ध केली जाणार आहे. वाहतुकीला अडथळा होऊ नये, यासाठी पोलीस मोटारचालकांना वाहनतळांचे पर्याय सुचवतील. तसेच सणांच्या खरेदीसाठी शहरात येणाऱ्या नागरिकांनी निर्धारित वाहनतळांवरच मोटारी उभ्या कराव्यात. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नागरिकांनी वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे,” – सुभाष पुजारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पनवेल शहर वाहतूक विभाग