पनवेल: सरकारकडून घरगुती गॅस सिलेंडरचा कोणताही तुटवडा नसल्याचा दावा केला जात असताना नवीन पनवेलमध्ये मात्र नागरिकांना गॅससाठी अक्षरशः रांगा लावण्याची वेळ आली आहे. गेल्या काही दिवसांपासून घरपोच गॅस मिळत नसल्याने सिलेंडरधारकांनी थेट नवीन पनवेल येथील सह दुय्यम निबंधक कार्यालयाशेजारच्या भारत गॅस कंपनीच्या एजन्सीसमोर सिलेंडर घेऊन रांगा लावल्याचे चित्र बुधवारी पाहायला मिळाले. यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र संपात व्यक्त होत असून घरगुती गॅसचा पुरवठा व्यावसायिकांना केला जात असल्याचा आरोपही नागरिकांकडून केला जात आहे.

सरकारकडून नागरिकांना अफवांवर विश्वास ठेवू नका, घरगुती गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे वारंवार सांगितले जात आहे. मात्र प्रत्यक्षात नवीन पनवेल परिसरातील सिलेंडरधारकांसमोर वास्तव काही निराळे आहे. अनेक नागरिकांना गेल्या तीन ते चार दिवसांपासून घरगुती गॅस सिलेंडर मिळत नसल्याची तक्रार आहे. घरपोच सेवा वेळेवर मिळत नसल्याने नागरिकांना स्वतः सिलेंडर घेऊन गॅस एजन्सीसमोर रांगा लावाव्या लागत आहेत.

बुधवारी सकाळपासून अनेक सिलेंडरधारक एजन्सीबाहेर आपल्या रिकाम्या सिलेंडरसह उभे असल्याचे दिसून आले. अनेकांनी आपल्या कामावर दांडी मारून गॅस मिळवण्यासाठी एजन्सीकडे धाव घेतली. मात्र दिवसभर प्रतीक्षा करूनही अनेकांना सिलेंडर न मिळाल्याने संताप व्यक्त केला जात आहे.नवीन पनवेलमधील रहिवासी प्राध्यापक बिजली दडपे यांनी या परिस्थितीबाबत लोकसत्ताशी बोलताना तीव्र नाराजी व्यक्त केली.

“गेल्या चार दिवसांपासून नंबर लावूनही घरगुती गॅस मिळत नाही. सरकार अफवांवर विश्वास ठेवू नका असे सांगते, मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. दररोज सिलेंडर मिळेल असे सांगितले जाते, पण दररोज रिकाम्या हाताने परत जावे लागते,” असे त्यांनी सांगितले.त्या पुढे म्हणाल्या की, “मंगळवारी सकाळी आठ वाजता येण्यास सांगितले होते. मात्र बुधवारी एजन्सीवर गेल्यावर गॅस पहाटे सहा वाजताच संपल्याचे सांगण्यात आले. आमच्या नंबरवरील सिलेंडर नेमका कोणाला दिला, याची चौकशी पुरवठा विभागाने करणे आवश्यक आहे.”

सरकारने घरगुती गॅसचा गैरवापर होऊ नये तसेच तो व्यावसायिक वापरासाठी देऊ नये, असे स्पष्ट निर्देश दिले असतानाही अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांनी प्रशासनाने तातडीने लक्ष घालून नियमित पुरवठा सुनिश्चित करावा, अशी मागणी केली आहे.