पनवेल : गुंतवणुकीची रक्कम महिनाभरात दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून चार जणांची ७२ लाख ९८ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार पनवेलमध्ये उघडकीस आला आहे. उरण तालुक्यातील जेएनपीटी टाऊनशिप, पिरकोन आणि करंजा परिसरातील रहिवाशांनी याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात बुधवारी तक्रार दाखल केली. काही दिवसांत गुंतवणुकीवर मोठा परतावा मिळेल, या आश्वासनावर विश्वास ठेवून संबंधितांनी लाखो रुपये गुंतवले होते.
पनवेल शहर पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, कोप्रोली येथे राहणाऱ्या ३२ वर्षीय महिलेने ही फसवणूक केली आहे. पनवेल शहरातील ओरियन मॉलमध्ये या महिलेने पहिल्या गुंतवणूकदाराची भेट घेऊन महिन्याभरात गुंतवलेली रक्कम दुप्पट करून देण्याचे आश्वासन दिले. तसेच गुंतवलेली मूळ रक्कम सुरक्षित राहील, असेही तिने भासवले.
या आश्वासनावर विश्वास ठेवून उरण तालुक्यातील कोंढरीपाडा (करंजा) येथील ३१ वर्षीय व्यक्तीने ८ सप्टेंबर रोजी चार लाख रुपये, तर ९ सप्टेंबर रोजी ९८ हजार रुपये गुंतवले. त्यानंतर आणखी तीन व्यक्तींनीही या महिलेच्या योजनेत लाखो रुपयांची गुंतवणूक केली. अशा प्रकारे चार गुंतवणूकदारांकडून एकूण ७२ लाख ९८ हजार रुपये स्वीकारण्यात आले.
महिनाभराचा कालावधी उलटूनही आश्वासनानुसार परतावा मिळाला नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांनी मूळ रक्कम परत मागण्यास सुरुवात केली. मात्र, संबंधित महिला टाळाटाळ करू लागल्याने आपली फसवणूक झाल्याचा संशय गुंतवणूकदारांना आला. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली.
सुरुवातीला हे प्रकरण नवी मुंबई पोलीस दलाच्या आर्थिक गुप्तवार्ता कक्षाकडे चौकशीसाठी पाठविण्यात आले. पोलीस उपायुक्त (गुन्हे) सचिन गुंजाळ यांच्या पथकाने या प्रकरणाची चौकशी केली. त्यानंतर संबंधित महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. यापूर्वीही उरणच्या एका तरूणाने अशाच प्रकारे स्थानिक व प्रकल्पग्रस्तांची कोट्यावधी रूपयांची फसवणूक केल्याने अनेकांना कर्जबाजारी होण्याची वेळ आली. या घटनेमुळे मोर्चे व आंदोलन झाले. त्यानंतर अशा प्रकारचे गुन्हे घडू नयेत म्हणून नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनीही स्थानिक पोलिसांसह आर्थिक गुप्तवार्ता कक्षाच्या पोलिसांना गोपनिय माहिती काढून लक्ष्य ठेवण्याच्या सूचना दिल्या. परंतू तरीही आमिषाला बळी पडून नवीन दामदुप्पट योजनेचे प्रकरण घडलेच.
