पनवेल : कळंबोली येथील मुंबई महानगर प्रदेश लोखंड पोलाद बाजार समितीच्या मुदतठेवी बँकेत ठेवण्याच्या बहाण्याने भामटा व त्याच्या साथीदारांनी ५४ कोटी रुपयांचा अपहार केला होता. नवी मुंबई गुन्हे अन्वेषण युनीट दोनच्या पोलीस पथकाने या गंभीर प्रकरणात चौकडीला अटक केल्यानंतर त्यांच्याकडून चार आलिशान मोटारी जप्त केल्या आहेत. तसेच मोटारींसह एक गाळा, सदनिका आणि काही बँक खाती गोठवून काही मालमत्तेवर सह निबधंक विभागाकडून बोजा चढविला आहे. या अपहारातील मुख्य आरोपीने राज्यातील लोखंड बाजार समितीच्या अपहारातील रकमेची उधळण तेलंगणा येथे केल्याचे उजेडात येत आहे. सध्या ही चौकडी न्यायालयीन कोठडीत आहे.दीड महिन्यापूर्वी कळंबोली पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा नोंदविण्यात आला होता. मुंबई महानगर प्रदेश लोखंड पोलाद बाजार समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी निकम यांच्या तक्रारीनंतर नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी या गंभीर गुन्ह्याचा तपास गुन्हे अन्वेषण विभाग युनीट २ कडे सोपविला होता. पोलीस निरिक्षक उमेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाची सखोल तपास सूरु आहे. पोलीसांनी अजूनही या प्रकरणात अटक करणे शिल्लक असल्याने अटकेत असलेल्या आरोपींची माहिती पोलीसांनी देण्यास नकार दिला. हेही वाचा.Rehabilitation for Irshalwadi citizens : इरशाळवाडीच्या गृहप्रकल्प हस्तांतरणाला महिनाभराची प्रतिक्षा सुमन शर्मा या भामट्याने त्याची ओळख युको बँकेचा व्यवस्थापक अशी बाजार समितीमधील कर्मचारी, अधिकारी आणि बाजार समितीच्या अध्यक्षांसमोर केली होती. शर्माची कोणतीही चौकशी न करता समितीने हातोहात ५४ कोटी रुपयांचे धनादेश भामट्याच्या स्वाधीन केले. दोन वर्षात भामटा सुमन व त्याच्या साथीदारांनी विविध बँक खात्यांमध्ये हे धनादेश जमा करुन त्या धनादेशाची रक्कम वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये वळती करुन काढून घेतली. यासाठी अनेक बँक खात्यांचा वापर करण्यात आला. ज्यांचे बँक खाते वापरले त्यांनाही काही टक्केवारी देण्यात आली. यातील मुख्य आरोपी हा तेलंगणा येथील असल्याने त्याने वेगवेगळ्या आलिशान मोटारी खरेदी केल्या. यामध्ये फोर्च्युनर, जीप कंपनीची कंपास, क्रेस्टा, सफारी या मोटारींचा समावेश आहे. विशेष म्हणजे या मोटारींचे सर्व नंबर हे व्हीआयपी असल्याने हे नंबर मिळविण्यासाठी आरोपीने अपहारातील लाखो रुपये खर्च केल्याचे पोलीस तपासात उघड झाले. महाराष्ट्रातील लोखंड पोलाद बाजार समितीच्या अपहारातील रक्कम तेलंगणा येथे जाऊन खर्च करुन याच अपहाराच्या रकमेतून भामट्याने स्वताचे लग्न लावले. या लग्नासाठी सुद्धा लाखो रुपयांची उधळन करण्यात आल्याचे समजते. पोलीसांचा तपास अद्याप सूरु असून माहिती देण्यास पोलीसांनी नकार दिला. या अपहारानंतर कळंबोली येथील लोखंड बाजारातील विकासकामे ठप्प झाली आहेत. व्यापाऱ्यांनाकडून विविध करातून जमवलेले शुल्क आणि बाजारातील विविध उत्पन्नातून बाजार समितीने ५४ कोटी रुपये जमा केले होते. या अपहारामध्ये लोखंड पोलाद बाजार समितीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींच्या मदतीशिवाय हा अपहार अशक्य असल्याचा संशय व्यापारीवर्गाकडून व्यक्त केला जात असल्याने बाजार समितीचे वेतन घेऊन भामट्याला मदत करणाऱ्या 'त्या' भ्रष्ट अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला पोलीस कधी पकडणार याकडे व्यापारी वर्गाचे लक्ष लागले आहे. हेही वाचा.Yashashree Shinde Murder Case : दाऊद शेखला अटक झाल्यानंतर यशश्रीच्या आईची थेट मागणी; म्हणाली, “टॉर्चर करून त्याला…” ५४ कोटी रुपयांचा अपहार नेमका कसा घडला ?बाजार समितीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी कदम यांनी पदभार स्विकारण्यापूर्वी दोन वर्षात टप्याटप्याने लोखंड पोलाद बाजार समितीमधील कॅनरा बँकेत असलेली रक्कम मुदतठेवी ठेवण्यासाठी सुमन शर्मा या भामट्याला धनादेशाच्या माध्यमातून समितीमधील कर्मचारी, अधिकारी आणि समितीच्या अध्यक्षांनी दिल्याने हा अपहार झाला होता.