पनवेल – दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणाशी संबंधित असल्याचा धाक दाखवून पनवेलमधील एका ६२ वर्षीय निवृत्त नागरिकाला ‘डिजिटल अटके’ची भिती घालून तब्बल दिड कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार पनवेलमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सायबर गुन्हेगारांच्या नव्या युक्तीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ६२ वर्षीय जेष्ठ नागरीक हे कळंबोली येथील स्टील मार्केटमधील नोकरीवरून निवृत्त झाले असून त्यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. २३ ते ३० मार्च या दरम्यान त्यांची फसवणूक झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सुरूवातीला त्यांच्या मोबाईलवर व्हॉट्सएॅवर व्हीडीओ कॉल आला.
या कॉलवर सिग्नल अॅपच्या साह्याने कंबोडियाच्या कोडवरून व्हॉट्सअॅपवर संपर्क साधणा-या व्यक्तीने स्वतःला दिल्लीतील एटीएस अधिकारी असल्याचे सांगत, आरबीआयचे बनावट पत्र दाखवून गेल्या वर्षी झालेल्या दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात त्यांचा संबंध असल्याचा आरोप केला. तसेच राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला असल्याचे सांगण्यात आले.
संबंधित व्यक्तीने ‘डॉ. सहानी’ नावाच्या व्यक्तीने पिडित जेष्ठाच्या नावावर सिमकार्ड घेतले असून त्याद्वारे बँक खाते उघडण्यात आले असल्याचा दावा केला. या खात्यात २.७ कोटी रुपयांची संशयास्पद रक्कम जमा झाल्याचे सांगून दहशतवादी निधीचा संशय व्यक्त करण्यात आला. तपासाच्या नावाखाली पिडितांना ‘सिग्नल’ अॅप डाउनलोड करण्यास भाग पाडण्यात आले आणि त्यांना ‘डिजिटल अटक’ असल्याचे सांगण्यात आले.
यानंतर घाबरलेल्या जेष्ठांकडून त्यांचे बँक खाते, मालमत्ता, सोने तसेच गुंतवणुकीची संपूर्ण माहिती घेण्यात आली. प्रकरणातून सुटका करून देण्याच्या नावाखाली त्यांच्याकडून विविध खात्यांमध्ये १ कोटी ५४ लाख ९८ हजार रुपये वर्ग करण्यात आले. तपासानंतर ही रक्कम परत मिळेल, असे आश्वासन देण्यात आले होते.
३० मार्च रोजी पुन्हा भारतातील क्रमांकावरून कॉल करून कागदपत्रे पनवेल पोलिस ठाण्यात पाठविल्याचे सांगण्यात आले. मात्र त्यानंतर आरोपीचा संपर्क तुटल्याने पिडित जेष्ठांना फसवणूक झाल्याची जाणीव झाली. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात बुधवारी सायंकाळी गुन्हा नोंदवला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
