पनवेल : पनवेल तालुक्यातील वलप ग्रामपंचायतीच्या नावाखाली तब्बल २६६० जन्म-मृत्यू दाखल्यांचा घोटाळा रायगड जिल्ह्यात उघड झाला होता. रायगड जिल्ह्याप्रमाणे यवतमाळ, जळगाव आणि नांदेड अशा अन्य ठिकाणी हजारोंच्या संख्येने बनावट जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांची नोंदणी केल्याचे उघड झाले होते. या प्रकरणी सोमवारी आणखी एकाला अटक करण्यात आली. दोन आरोपींना यापूर्वीच गजाआड करण्यात आले.
पनवेल तालुका पोलिसांनी संशयित आरोपींना यवतमाळ पोलिसांच्या ताब्यात दिले. पनवेल तालुका पोलीस ठाण्यात २६ फेब्रुवारी रोजी गुन्हा नोंदविण्यात आल्यानंतर युद्धपातळीवर तपास करण्यात आला. वलप ग्रामपंचायतीच्या नावाचा वापर या गुन्ह्यात कसा झाला, याचा शोध पोलिसांनी लावला आहे.
या प्रकरणातील तिन्ही संशयितांना पनवेल तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यापैकी दोघांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली तर २२ वर्षीय संशयित आरोपीला ४ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. एका दाखल्यासाठी ५ ते १० हजार रुपये घेऊन हे संशयित जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांची नोंदणी करत असल्याचे उघड झाले आहे. सीआरएस पोर्टलवरून जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांची नोंदणी केली जाते. या पोर्टलमधील काही त्रुटींचा फायदा या सायबर गुन्हेगारांनी घेतला.
