पनवेल : शहरालगतच्या गाढी नदीपात्रासह इतर नैसर्गिक नाल्यांमध्ये उड्डाणपूल उभारले जात आहेत. यामुळे येथे मोठ्या प्रमाणात मातीचे भराव टाकण्यात आले असून पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अरुंद झाला आहे. अतिवृष्टीच्या काळात या अडथळ्यांमुळे शहरातील सखल भागांत पाणी साचण्याचा धोका वाढला आहे. दरम्यान या भरावांबाबत पनवेल महापालिकेने दोन वेळा सिडकोकडे पत्रव्यवहार करून भराव हटविण्याची मागणी केली असली तरी अद्याप भराव कायम असल्याने नागरिक चिंता व्यक्त करत आहेत.

पनवेल परिसरात सध्या विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांची कामे सुरू आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जेएनपीए बंदरातून अवजड वाहनांना थेट कार्गो टर्मिनलपर्यंत पोहोचता यावे यासाठी सिडकोकडून उड्डाणपुलांचे जाळे उभारण्यात आले आहे. या पुलांच्या खांबांखाली (पिलर्सखाली) नदीपात्रालगत मोठ्या प्रमाणात भराव टाकण्यात आले आहेत. त्यामुळे नदीपात्राची रुंदी कमी झाली असून नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहाला अडथळे निर्माण झाले आहेत. विकासकामे पूर्ण झाल्यानंतरही हे तात्पुरते भराव काढण्यात आलेले नाहीत. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या नैसर्गिक मार्गांची क्षमता घटली आहे.

मागील दोन वर्षांत पावसाळ्यात पनवेल शहर व परिसरात अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडल्या होत्या. यामागे नैसर्गिक प्रवाहात झालेल्या अडथळ्यांचाही मोठा वाटा असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. पनवेल महापालिकेने संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी सिडको मंडळाला दोन वेळा पत्र पाठवून नदीपात्रातील मातीचे भराव तातडीने हटविण्याची मागणी केली आहे. मात्र त्यानंतरही भराव कायम असल्याचे दिसून येत आहे.

पावसाची निम्मी नोंद

हवामान विभागाच्या १ जुलैच्या अहवालानुसार, पनवेल तालुक्यात आतापर्यंत ३०१ मिमी पावसाची नोंद झाली असून, ही सरासरीच्या ५२.२ टक्के आहे. मागील वर्षी याच दिवशी ६१९ मिमी पावसाची नोंद झाली होती, जी सरासरीच्या १०७.३ टक्के होती. त्यामुळे यंदा आतापर्यंत पावसाचे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेत लक्षणीयरीत्या कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, पनवेलमधील गाढी नदीची धोक्याची पातळी ६.५० मीटर असून, सध्या नदीची पाण्याची पातळी २.१५ मीटर आहे. त्यामुळे गाढी नदी अद्याप धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचलेली नाही.

विमानतळाच्या कामामुळे गाढी नदीपात्राचा प्रवाह काही अंशी वळवण्यात आला आहे. तसेच विमानतळापर्यंत पोहचण्यासाठी बांधकाम होत असलेल्या उड्डाणपुलांसाठी नदीपात्रात केलेला भराव वेळीच न काढल्यास पनवेल शहराला अतिवृष्टी व समुद्राच्या भरतीवेळी पुराचा धोका उद्भवेल. – सुरेश रिसबूड, पर्यावरण अभ्यासक

नवी मुंबई विमानतळाच्या कामातील पुलाखाली केलेल्या मातीच्या भरावामुळे शहराला पूरस्थितीचा धोका कायम आहे. संबंधित पुलांखालील भराव हटविण्यासाठी पनवेल महापालिकेने सिडकोकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. या व इतर प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी सिडकोच्या नव्या व्यवस्थापकीय संचालकांची भेट मागितली असून, ती न मिळाल्यास आमदारांच्या माध्यमातून राज्याच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत. – नितीन पाटील, महापौर, पनवेल महापालिका