पनवेल : गणेशोत्सवाच्या काळात पनवेल शहरातील बाजारपेठेत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी विशेष नियोजन केले असून, नागरिकांनी अनधिकृतपणे रस्त्यावर वाहने उभी न करता प्रशासनाने निश्चित केलेल्या पार्किंगच्या जागांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, वाहतूक पोलिसांकडून नियोजनाची अंमलबजावणी सुरू असताना रस्त्याकडेला फुल व पालेभाजी विक्रेत्यांची अतिक्रमणे हटविण्याची जबाबदारी महापालिकेची असतानाही वाहतूक पोलिसांनाच शुक्रवारी सकाळी पुढाकार घ्यावा लागत असल्याचे चित्र पनवेलमध्ये दिसून आले.गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस, महापालिका, लोकप्रतिनिधी आणि गणेशोत्सव मंडळांच्या समन्वयाच्या बैठका घेऊन वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.
त्यानुसार फडके नाट्यगृहासमोरील मराठी शाळा, नवीन तहसील कार्यालय, टपाल नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या मागील व समोरील जागा, कर्नाळा सर्कलजवळील जागा, लाईन आळी रोडवरील विलास कोठारी यांच्या जागेतील परिसर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यामागील डी.एड. कॉलेजसमोरील मोकळी जागा पार्किंगसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. परंतू यातील काही जागा अद्याप महापालिकेने स्वच्छ न केल्याने तात्पुरत्या वाहनतळाची सोय कधी केली जाणार असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. आवश्यकतेनुसार एकेरी वाहतूक, सम-विषम पार्किंग आणि बॅरिकेडिंग करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी नियोजन केले आहे. उरण नाका ते टपाल नाका परिसरातील व्यापाऱ्यांसाठी जड व अवजड वाहनांच्या माल चढ-उताराची वेळ दुपारी १ ते ४ अशी निश्चित करण्यात आली असल्याचे वाहतूक पोलीस विभागाने स्पष्ट केले आहे.पनवेलच्या बाजारपेठेतील रस्ते व पदपथांवरील अतिक्रमणे, कचरा तसेच रस्त्याच्या कडेला ठेवण्यात आलेले साहित्य हटविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. शुक्रवारी वाहतूक पोलिसांनी कारवाई सुरू केली. ही बाब महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त महेशकुमार मेघमाळे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी लगेच प्रभाग अधिका-यांना तेथे पथक पाठवून कारवाईचे आदेश दिले. महापालिकेने पुढाकार घेतला नाही तर वाहतूक नियोजन बैठकीपुरतेच मर्यादित राहण्याची शक्यता आहे.
गणेशोत्सव बंदोबस्तासाठी पनवेल शहर वाहतूक शाखेचे ७० कर्मचारी आणि सात अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. पनवेल महापालिकेकडे नवी मुंबई पोलिसांनी अतिरीक्त ५० वार्डनची मागणी केली आहे.गणेशोत्सवात वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित राहावी यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मी स्वता आणि माझे कर्मचारी रस्त्यावर उतरून कारवाई करत आहे. नागरिकांनी रस्त्यावर वाहने न उभी करता प्रशासनाने निश्चित केलेल्या पार्किंगच्या ठिकाणांचाच वापर करावा. वाहतूक कोंडीमुक्त गणेशोत्सवासाठी नागरिकांनी वाहतूक पोलिसांना सहकार्य करून वाहतूक नियमांचे पालन करावे – सुभाष पुजारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पनवेल शहर वाहतूक शाखा वाहतूक पोलिसांनी वळवलेले आणि बंद केलेले मार्गउरण नाका ते टपाल नाका मार्गावर रिक्षा आणि चारचाकी वाहनांना प्रवेशबंदी राहणार असल्याने संबंधित वाहने उरण नाका-पंचरत्न सर्कलमार्गे वळविण्यात येतील. तसेच फुल मार्केट ते पोलीस चौकी – पटेल हॉस्पिटल मार्ग तसेच कर्नाळा फुल मार्केट ते कर्मवीर भाऊराव चौक हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
गणेशोत्सव काळात बाजारपेठेतील गर्दी टाळण्यासाठी रस्त्यावर व्यवसाय करणा-या फूल विक्रेते आणि पालेभाजी विक्रेत्यांना पर्यायी जागा कर्नाळा फुट मार्केट ते कर्मवीर भाऊराव चौक हा मार्ग बंद करून त्या जागेवर देण्यात आली आहे. गर्दीच्या ठिकाणी चोरीच्या घटना यामुळे टळू शकतील यासाठी हे नियोजन केल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगीतले.
