पनवेल : पनवेल महानगरपालिका क्षेत्रात गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे सखल भागांमधील घरांमध्ये पाणी शिरल्याने महापालिका प्रशासनाने आतापर्यंत ४३५ नागरिकांचे चार तात्पुरत्या निवारा केंद्रांमध्ये सुरक्षितस्थळी स्थलांतर केले आहे. स्थलांतरित नागरिकांसाठी चहा, नाश्ता, जेवण, पिण्याचे पाणी तसेच अन्य आवश्यक सुविधांची व्यवस्था करण्यात आली असून आरोग्य तपासणीही करण्यात येत आहे. महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांच्या निर्देशानुसार संपूर्ण प्रशासन अलर्ट मोडवर कार्यरत आहे.
अतिवृष्टीमुळे पाणी साचणाऱ्या भागांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. आपत्कालीन व्यवस्थापन विभागामार्फत पटेल मोहल्ला व कच्ची मोहल्ला परिसरातील भारतनगर झोपडपट्टीतील १४९ नागरिकांना उर्दू शाळेत, २११ नागरिकांना कोळीवाडा शाळेत, तर एचओसी कॉलनीतील आदिवासी वाडीतील ७५ नागरिकांना क्रीडा संकुलातील निवारा केंद्रात सुरक्षितरीत्या हलविण्यात आले आहे. भांडार विभागामार्फत या नागरिकांना चहा, बिस्किटे, नाश्ता, जेवण, पिण्याचे पाणी आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थलांतरित नागरिकांची आरोग्य तपासणीही करण्यात आली.
कामोठे प्रभाग अधिकारी दशरथ भंडारी, पनवेल प्रभाग प्रभारी अधिकारी राजेश डोंगरे आणि मुख्य निरीक्षक अरुण कांबळे यांनी निवारा केंद्रांना भेट देऊन नागरिकांना कोणतीही गैरसोय होणार नाही याची पाहणी केली.
साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेने युद्धपातळीवर उपाययोजना सुरू केल्या आहेत. जेटिंग मशिन व जेसीबीच्या सहाय्याने गटारांमधील अडथळे व कचरा हटविण्याचे काम सुरू असून विविध ठिकाणी पाण्याचा जलद निचरा करण्यासाठी कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. चारही प्रभागांतील परिस्थितीवर प्रशासनाचे सातत्याने लक्ष असून सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने खारघर येथील ड्रायव्हिंग रेंज आणि पांडवकडा मार्ग तात्पुरता बंद करण्यात आला आहे. या परिसराची अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे, सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर आणि प्रभारी अधिकारी जितेंद्र मढवी यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे यांनी बांठिया शाळा, पाणी साचलेले विविध भाग तसेच निवारा केंद्रांना भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. कामोठे गणपती मंदिर परिसरात दोन पंपांच्या साहाय्याने रस्त्यावर साचलेल्या पाण्याचा पूर्ण निचरा करण्यात आला. अतिरिक्त आयुक्त महेशकुमार मेघमाळे आणि नगरसेवक समीर ठाकूर यांनी नवीन पनवेल होल्डिंग पॉण्डची पाहणी केली.
कामोठे सेक्टर ६ येथील सरिता संगम सोसायटीतील चौथ्या मजल्यावरील एका सदनिकेचे पीओपी कोसळल्याची घटना घडली. या घटनेत कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नाही. संबंधित सोसायटीला यापूर्वीच स्ट्रक्चरल ऑडिट करण्याबाबत नोटीस देण्यात आली होती. या ठिकाणी अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे, परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे, उपायुक्त स्वरूप खारगे आणि उपायुक्त अभिषेक पराडकर यांनी पाहणी करून आवश्यक सूचना दिल्या.
आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी महापालिकेची सर्व यंत्रणा सज्ज असून मदतकार्य सुरू असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अतिरिक्त आयुक्त कैलास गावडे यांनी दिली. महापौर नितीन पाटील यांनी विविध पाणी साचलेल्या भागांची पाहणी करून अधिकाऱ्यांना तातडीने पाण्याचा निचरा करण्याच्या सूचना दिल्या. तसेच नागरिकांनी अनावश्यक बाहेर पडणे टाळून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले. त्यांनी निवारा केंद्रांनाही भेट देऊन उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधांचा आढावा घेतला. यावेळी नगरसेवक सुमित झुंजारराव, दर्शना भोईर आणि डॉ. वैभव विधाते उपस्थित होते.
आयुक्त मंगेश चितळे यांनी ऑनलाइन बैठकीद्वारे चारही प्रभागांतील आपत्कालीन परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. पाणी साचलेल्या ठिकाणांवरील उपाययोजना, स्थलांतरित नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधा आणि आपत्कालीन कामकाजाचा आढावा घेऊन सर्व यंत्रणा सतत सज्ज ठेवण्याचे निर्देश संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले.
