पनवेल : गर्भाशयमुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळावे यासाठी राज्य शासनाने राबविलेल्या एचपीव्ही (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस) लसीकरण मोहिमेला रायगड जिल्हा आणि पनवेल महानगरपालिका क्षेत्रात अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. रायगड जिल्ह्यातील २५ हजार ८७० पात्र मुलींपैकी केवळ ७०१ मुलींना लस देण्यात आली असून पनवेल महापालिका क्षेत्रात ७ हजार ७६९ मुलींपैकी अवघ्या २८५ मुलींचे लसीकरण झाले आहे. त्यामुळे पनवेलमध्ये केवळ ३.७ टक्के उद्दिष्टपूर्ती झाली.
१४ वर्षे पूर्ण झालेल्या आणि १५ वर्षे पूर्ण न झालेल्या मुलींना गर्भाशयमुखाच्या कर्करोगापासून संरक्षण देण्यासाठी ८ मार्च ते ३१ मे या ८४ दिवसांमध्ये पनवेल महापालिकेच्या १५ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सोमवार ते शनिवार सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.
पालकांचा अल्प प्रतिसाद, शाळांमधील परीक्षा आणि उन्हाळी सुट्ट्यांचा कालावधी यामुळे लसीकरणाचे अपेक्षित उद्दिष्ट गाठता आले नाही. मात्र, समाजमाध्यमांवर लसीकरणाबाबत पसरविण्यात आलेल्या चुकीच्या माहितीचा आणि अफवांचा देखील पालकांच्या निर्णयावर परिणाम झाल्याचे बोलले जात आहे. – डॉ. आनंद गोसावी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, महापालिका आरोग्य विभाग.
