पनवेल – समाजमाध्यमावरील ओळखीचा गैरफायदा घेत एका २१ वर्षीय तरुणाची तब्बल १५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार पनवेलमध्ये उघडकीस आला आहे. बनावट इंस्टाग्राम आयडीच्या माध्यमातून मैत्री करून आजारपणाचे कारण सांगत पैसे उकळल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणी पनवेलमध्ये राहणा-या २१ वर्षीय तरूणाने पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. गेल्या वर्षी २० डिसेंबर ते ४ एप्रिल या कालावधीत एका बनावट इंस्टाग्राम आयडीद्वारे तरूणाशी संपर्क साधण्यात आला. संबंधित व्यक्तीने स्वतःला ‘साक्षी’ नावाची मुलगी असल्याचे भासवून तिच्या वडिलांच्या आजारपणासाठी आणि शस्त्रक्रियेसाठी पैशांची गरज असल्याचे सांगितले.यानंतर मोबाईलवरील व्हॉट्सअॅपवरून ‘निखील माने’ नावाचा व्यक्त संपर्क साधत होता. त्याने स्वताची ओळख साक्षीच्या मैत्रिणीचा भाऊ असल्याचे सांगीतले होते. विश्वास संपादन केल्यानंतर आरोपींनी २१ वर्षीय तरूणाकडून टप्प्याटप्प्याने १४ लाख रुपये रोख आणि १ लाख रुपये गुगल पेच्या माध्यमातून उकळले.या दरम्यान, ४ एप्रिल रोजी दुपारी पिडित २१ वर्षीय तरूणाला सीवूड परिसरातील मॉलसमोर भेटण्यास बोलावले.
तेथे आरोपीने त्याचा मोबाईल हिसकावून घेत आणखी पैशांची मागणी केली. पैसे न दिल्यास बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची तसेच कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अभय कदम अधिक तपास करत आहेत. समाजमाध्यमांवरील अनोळखी व्यक्तींशी संबंध ठेवताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
