पनवेल – कळंबोली परिसरात मोबाईल हिसकावण्याची घटना घडल्यानंतर नवी मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला करण्यात आलेल्या एका तक्रारीमुळे अवघ्या काही मिनिटांत दोन चोरट्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांच्या तत्परतेमुळे गुन्हेगारांना वेळीच जेरबंद करण्यात आले.

कळंबोली येथील बीमा कॉम्प्लेक्स ते फुडलॅण्डकडे जाणाऱ्या सेवा रस्त्यावर मंगळवारी सकाळी सुमारे सात वाजता ही घटना घडली. ३६ वर्षीय भंगार व्यावसायिक आपल्या कामानिमित्त या रस्त्याने जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी तरुणांनी त्याला अडवले. या तरुणांनी चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडील मोबाईल फोन हिसकावून घेतला आणि तेथून पळ काढला.

घटनेनंतर घाबरलेल्या व्यावसायिकाने जवळील इतर व्यावसायिकांना याची माहिती दिली. सुरुवातीला परिसरातील नागरिकांना या घटनेवर विश्वास बसला नाही. मात्र एका व्यावसायिकाने तत्काळ नवी मुंबई पोलिसांच्या ११२ या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून माहिती दिली.

नियंत्रण कक्षाला मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयितांचे वर्णन त्वरित कळंबोली पोलीस ठाण्यास पाठविण्यात आले. तसेच परिसरात गस्त घालणाऱ्या बीट मार्शलना सतर्क करण्यात आले. मिळालेल्या वर्णनानुसार पोलिसांनी फुडलॅण्ड कंपनीसमोरील रस्त्यावर संशयित दुचाकीस्वारांची तपासणी सुरू केली.

या तपासादरम्यान सकाळी साडेदहा वाजता दोन संशयित तरुणांना ताब्यात घेण्यात आले आणि पुढील चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. दरम्यान, मोबाईल चोरी झालेला व्यावसायिकही तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आला असता त्याने या दोघांना ओळखले.

चौकशीत हे दोघेही भिवंडी येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले असून त्यांनीच हा गुन्हा केल्याची कबुली दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांनी सांगितले की, नियंत्रण कक्षाच्या तत्परतेमुळे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक नितिन शिंदे, तृप्ती शेळके, पोलीस उपनिरीक्षक अमोल चौगले यांच्यासह पोलिस कर्मचा-यांनी जलद कारवाई केल्यामुळे आरोपींना लगेच पकडणे शक्य झाल्याची माहिती दिली.