पनवेल : अपघातानंतर गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल झालेल्या तरुणाच्या गळ्यातील सोनसाखळी बेशुद्ध अवस्थेचा फायदा घेत चोरट्याने लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शुद्धीवर आल्यानंतर गळ्यातील साखळी गायब झाल्याचे लक्षात येताच संबंधित तरुणाने तक्रार केली असून या प्रकरणी अखेर कामोठे पोलीस ठाण्यात गुरूवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नवीन पनवेल येथील सेक्टर ९ मधील रिद्धी अपार्टमेंटमध्ये राहणारा २४ वर्षीय तरुण २ मार्च रोजी दुचाकीवरून जात असताना अपघातग्रस्त झाला. या अपघातात तो गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडला. स्थानिकांनी तत्काळ त्याला कामोठे येथील महात्मा गांधी मिशन रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात उपचारासाठी दाखल केले.दरम्यान, तरुण बेशुद्ध अवस्थेत असल्याचा गैरफायदा घेत अनोळखी व्यक्तीने त्याच्या गळ्यातील सोनसाखळी चोरी केल्याचा आरोप आहे.

काही वेळाने शुद्धीवर आल्यानंतर गळ्यातील साखळी नसल्याचे लक्षात येताच तरुणाला धक्का बसला. या सोनसाखळीचे वजन सुमारे १८ ग्रॅम असून तिची किंमत जवळपास दोन लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. या घटनेनंतर संबंधित तरुणाने पोलिसांकडे १२ मार्चला अर्ज केला होता. पोलिसांनी प्राथमिक चौकशी करत मागील दोन महिन्यांत घटनेची पडताळणी केली.

झाल्याची खात्री झाल्यानंतर गुरुवारी अखेर कामोठे पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश पगारे करत असून रुग्णालय परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे रुग्णालयातील सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.